खडकवासला : राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी गर्दी

खडकवासला : राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी गर्दी
Published on
Updated on

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंना 425 व्या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी मानवंदना देण्यासाठी आज गुरुवारी (दि. 12) राजगडाच्या पायथ्याला पाल बुद्रुक (ता. वेल्हे) येथील मावळा तीर्थावर मावळ्यांचा जनसागर लोटला होता. जिजाऊंना वंदन करण्यासाठी राज्यासह देशभरातील महिला, जिजाऊभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशा, तुतारीच्या निनादात व जिजाऊ, शिवरायांच्या जयघोषाने राजगडाची दरीखोरी दुमदुमून गेली. देशभरातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिला, गुणवंतांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

मावळा जवान संघटना व मावळा परिवाराच्या वतीने जन्मोत्सवाचे आयोजन केले होते. हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पारंपरिक रिवाजात पूजन करून मानवंदना देण्यात आली. रायरेश्वराचे शिवाचार्य सुनील स्वामी जंगम यांच्या शिव-जिजाऊ वंदनेने सोहळ्यास प्रारंभ झाला. पहाटे हनुमंत दिघे व शिवाजी भोरेकर यांच्या हस्ते राजगड पूजन करण्यात आले. प्रास्ताविक इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी केले.

कर्नल सुरेश पाटील, वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज राजाभाऊ पासलकर, सरनौबत येसाजी कंक यांचे वंशज संजय कंक, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेश मोहिते, सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज ऋषिकेश गुजर, सरपंच नीता खाटपे, शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ आदी उपस्थित होते.
शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर यांनी जिजाऊ व शिवराय यांच्या शौर्याचा इतिहास जिवंत केला.

राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने शिरूर येथील जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर व बारामती येथील लेखिका अर्चना सातव यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय मावळाभूषण पुरस्काराने चिंबळी येथील शिवाजी बबन गवारे, भोर येथील समीर घोडेकर व खेड येथील दिव्यांग उद्योजक अमोल चौधरी यांचा तसेच राष्ट्रीय गुणवंत खेळाडू पुरस्काराने आंतरराष्ट्रीय जलतरणपटू संपन्न शेलार यांचा सन्मान करण्यात आला.छत्रपती महाराणी ताराराणी गौरव पुरस्काराने कोल्हापूर येथील पूजा यमगर, शिवानी कोळी, साक्षी मोहिले यांचा व आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा.कीर्ती जाधव, मधुबाला कोल्हे, प्राचार्य पांडुरंग पाटील यांचा सन्मान झाला.

आदर्श सरपंच पुरस्काराने मेरावण्याचे सरपंच सत्यवान रेणुसे यांचा व राजगडावर चढाई करणार्‍या तीन वर्षे वयाच्या आरोही रणखांबे हिच्यासह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. राजगड-तोरणा भागांतील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप करण्यात आले. सूत्रसंचालन संजय भिंताडे व शशिकांत जाधव यांनी केले. संयोजन तानाजी भोसले, विजय महाराज तनपुरे, लक्ष्मण दारवटकर आदींनी केले.

शिवकाळ जागा…
राजमाता जिजाऊ यांच्या पारंपरिक पालखी सोहळ्याने शिवकाळ जागा झाला होता. राजगड-तोरणागडांच्या शिवकालीन मार्गावरून ढोल-ताशा, तुतारीचा निनाद व जिजाऊ, शिवरायांच्या जयघोषात पालखी मिरवणूक मावळा तीर्थावर आली. पालखीच्या मानकरी कोल्हापूर येथील शिवकन्या प्रतिष्ठानच्या महिला, मुलींंसह मान्यवरांनी पालखीला खांदा दिला. मावळा तीर्थावरील शिवकालीन श्रीसिद्धेश्वर शंभुमहादेवाच्या प्रांगणात जिजाऊंच्या न्यायदानाच्या पाऊलखुणा आहेत. या ठिकाणी पालखीचे आगमन होताच हजारो जिजाऊभक्तांनी फुलांची उधळण करत जयघोष केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news