पुणे : मेट्रो विस्तारीकरणाचा सुधारित आराखडा तयार | पुढारी

पुणे : मेट्रो विस्तारीकरणाचा सुधारित आराखडा तयार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यातील विस्तारीकरणाचा सुधारित आराखडा महामेट्रोने तयार केला असून, तो महापालिकेला सादर केला आहे. यामुळे महापालिकेचे एक हजार कोटी रुपये वाचणार आहेत. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करणे आणि सध्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे.

पहिल्या टप्यातील मेट्रो प्रकल्पाचे काम गतीने सुरू असून, ते अंतिम टप्यात आले आहे. स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पाचा आराखडा अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर निगडी ते कात्रज असा मेट्रो मार्ग तयार होणार आहे.

दुसरीकडे मेट्रोचे जाळे आणखी वाढवण्यासाठी खराडी ते हडपसर ते खडकवासला, रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदणी चौक आणि एसएनडीटी ते माणिकबाग असा मेट्रोमार्ग करण्याचे प्रस्तावित आहे. या विस्तारित मेट्रो प्रकल्पाचा आराखडा महामेट्रोने तयार करून महापालिकेला सादर केला होता. या प्रकल्प आराखड्यानुसार दोन्ही मार्गांसाठी महापालिकेचे दायित्व 1269 कोटी रुपये दर्शविण्यात आले होते.

महापालिकेचे मोठे प्रकल्प सुरू असल्याने एवढे दायित्व देणे शक्य नाही, त्यामुळे सुधारित प्रकल्प आराखडा सादर करण्याच्या सूचना महापालिकेने केल्या होत्या. त्यानुसार महामेट्रोने सुधारीत आराखडा महापालिकेला सादर केला आहे. खराडी ते हडपसर ते खडकवासला हा मेट्रो मार्ग 25.862 किलोमीटरचा असणार आहे. तर या मार्गावर एकूण 22 मेट्रो स्थानके असतील. या मार्गासाठी एकूण खर्च 7 हजार 416 कोटी होणार आहे. एसएनडीटी ते माणिकबाग हा मार्ग 6.118 किलोमीटरचा असणार आहे. यादरम्यान 6 स्थानके असतील. हा मार्ग उन्नत असणार असून, यासाठी 1 हजार 657 कोटी इतका खर्च येणार आहे.

खराडी ते खडकवासला मार्गावरील स्थानके
खराडी चौक, साईनाथनगर, हडपसर रेल्वे स्टेशन, मगरपट्टा पूर्व, मगरपट्टा मुख्य, मगरपट्टा दक्षिण, हडपसर, रामटेकडी, फातिमानगर, रेस कोर्स, पुणे कँटोन्मेंट, सेव्हन लव्ह चौक, स्वारगेट पूर्व, दांडेकर पूल, देशपांडे उद्यान, राजाराम पूल, हिंगणे चौक, माणिकबाग, धायरी फाटा, नांदेड सिटी, दळवीवाडी, खडकवासला. एसएनडीटी ते माणिकबाग मेट्रो मार्गावरील स्टेशन ः पौड फाटा, कर्वे पुतळा, डाहाणूकर कॉलणी, वारजे, दौलतनगर

Back to top button