पुणे : 2023 भारताचे नेतृत्व प्रस्थापित करणारे वर्ष : उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर | पुढारी

पुणे : 2023 भारताचे नेतृत्व प्रस्थापित करणारे वर्ष : उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : येणार्‍या वर्षभरात जी -20 परिषदेसोबत अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि विभागीय संघटनांचे कार्यक्रम होणार असून त्यातील बहुतांश परिषदांचे प्रतिनिधित्व भारताकडे आहे. त्यामुळेच 2023 हे वर्ष जगातील भारताचे नेतृत्व प्रस्थापित करणारे आहे, असे मत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक व उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले. लाल महालापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत जी-20 शिखर परिषद जनजागृती फेरीचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते.

त्यासोबतच विद्यापीठाशी संलग्न साडेसात लाख विद्यार्थी तसेच प्राध्यापक व सामान्य नागरिकांसाठी देखील उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे ’जी 20 अध्यक्षपद : संधी, आव्हाने व युवकांची भूमिका ’ या विषयावर विशेष व्याख्यान झाले. त्यावेळी डॉ. देवळाणकर बोलत होते. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत तसेच राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी भूषविले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आणि राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे हे उपस्थित होते. डॉ. देवळाणकर म्हणाले, आजघडीला अन्य देशांचे सरासरी वय 50 च्या जवळपास असताना भारताचे सरासरी वय मात्र 35 आहे. आपल्याकडे जगाचे नेतृत्व करणारी तरुणाई आहे. जी – 20 परिषदेच्या निमित्ताने आपल्याला हीच बाब जगासमोर मांडायची आहे. जगातील 75 टक्के लोकसंख्या ही या जी-20 सहभागी देशांकडे आहे. या देशांकडे जगाचा जवळपास 85 टक्के बाजार आहे, तर विकासदराच्या 75 टक्के भागही या देशांकडे आहे.

Back to top button