‘जी 20’मुळे पोलिस अलर्ट; कोम्बिंग ऑपरेशन राबवून 660 गुन्हेगारांची झाडाझडती | पुढारी

‘जी 20’मुळे पोलिस अलर्ट; कोम्बिंग ऑपरेशन राबवून 660 गुन्हेगारांची झाडाझडती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात जी- 20 परिषदेसह प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून आठवड्यात दुसर्‍यांदा कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. बुधवारी 3 हजार 583 गुन्हेगारांची झाडाझडती घेतल्यानंतर 660 जण मिळून आले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाला पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

स्थानिक पोलिसांसह गुन्ह्यांतील विविध पथकांनी सोमवारी (दि. 9) रात्री नऊ ते पहाटे दोन वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविले, त्यात 698 जण मिळून आले. आर्म्स अ‍ॅक्टप्रमाणे 44 जणांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 145 कोयते, तीन तलवारी, पिस्तूल असा शस्त्रसाठा जप्त केला. तर बुधवारी पोलिसांनी पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या वेळी 568 हॉटेल, ढाबे व लॉजेस तपासण्यात आले.

पोलिसांकडून 160 बसथांबे, रेल्वेस्थानक, एसटी स्थानकावर गस्त घालण्यात आली. नाकाबंदीदरम्यान 1 हजार 244 जणांना अडवून तपासणी करण्यात आली. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंंद्र डहाळे, अपर आयुक्त रंजन शर्मा, अपर आयुुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, उपायुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त सुहैल शर्मा, उपायुक्त, शशिकांत बोराटे, उपायुक्त विक्रांत देशमुख, वाहतूक उपायुक्त विजय मगर , सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, नारायण शिरगावकर यांच्या पथकाने केली.

लॉज, हॉटेलची तपासणी
या वेळी स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकत्रितरीत्या कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यामध्ये हत्यार बाळगणे, मुंबई प्रोव्हिजन अ‍ॅक्ट, तडिपारी अशी एकूण 71 जणांवर कारवाई करण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणावर हॉटेल आणि लॉज यांची तपासणी देखील करण्यात आली. वाहतूक शाखेकडून देखील 841 संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 77 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत 39 वाहनांवर कारवाई करण्यात आली.

1 किलो 132 ग्रॅम गांजा जप्त
अंमली पदार्थविरोधी पथक एकने बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या सब्यासाची तपनकुमार पाणिग्रही (19, रा. म्हाळुंगे) याला अटक केली. त्याच्याकडून या वेळी 1 किलो 132 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

Back to top button