पुणे : हिंदू राष्ट्र सेनेच्या नऊ कार्यकर्त्यांना मरेपर्यंत जन्मठेप | पुढारी

पुणे : हिंदू राष्ट्र सेनेच्या नऊ कार्यकर्त्यांना मरेपर्यंत जन्मठेप

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसर परिसरातील रास्त धान्य दुकानदार प्रकाश नारायण गोंधळे यांचा कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेच्या नऊ जणांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप तसेच 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्रन्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला. विकी जाधव, वैभव भाडळे, अक्षय इंगुळकर, श्रीकांत आटोळे, अमोल शेगडे, राहुल कौले, विकी पाटील, सूरज फडके, आकाश शिंदे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

जून 2013 मध्ये प्रकाश गोंधळे यांच्या घरावर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी गोंधळे यांच्या दरवाजावर पेट्रोल टाकून तो जाळला. याखेरीज, घरात घुसून घरातील साहित्यांचे नुकसान केले होते. याबाबत, गोंधळे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर, 8 जुलै 2013 रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास प्रकाश गोंधळे हे नेहमीप्रमाणे रेशनिंग दुकानावरून त्यांच्या घरी चालले होते. या वेळी आरोपींनी त्यांना अडवत त्यांच्यावर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये गोंधळे यांचा मृत्यू झाला होता. याबाबत राजेंद्र पिंगळे यांनी फिर्याद दिली होती.

या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. गुन्हा सिद्ध करण्यासाठी अ‍ॅड. निकम यांनी एकूण 19 साक्षीदार तपासले. गोंधळे यांच्यावर केलेला हल्ला हा अतिशय क्रूर आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. निकम यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. निकाल देताना न्यायालयाने प्रत्येक गुन्हेगाराला 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेतून एक लाख 50 हजार रुपये गोंधळे यांच्या कुटुंबीयांना द्यावेत, असे आदेशात नमूद केले.

Back to top button