पुणे : तेरा शाळांवर होणार गुन्हे दाखल; अनधिकृत शाळांविरोधात जिल्हा परिषदेचे पाऊल

पुणे : तेरा शाळांवर होणार गुन्हे दाखल; अनधिकृत शाळांविरोधात जिल्हा परिषदेचे पाऊल
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अनधिकृतपणे सुरू झालेल्या इंग्रजी शाळांना पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. अनधिकृतपणे सुरू असलेल्या तेरा शाळांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना दिला आहे. राज्य सरकारची मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या शाळांची मनमानी थांबविण्यासाठी थेट गुन्हेच दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

यामध्ये पुंरदर, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील शाळांचा समावेश आहे. पुढील दोन दिवसांत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान, बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सीबीएसई शाळा सुरू केल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना त्या पाठोपाठ आता जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या अनधिकृत शाळांबाबत शिक्षण विभागाने कडक पाऊल उचलले आहे. अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळा शोधण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना शाळा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यामध्ये अशा 43 शाळा आढळून आल्या. जिल्हा परिषदेच्या कारवाईनंतर काही शाळा बंद केल्या, तर काही अद्यापही सुरूच असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे राज्य सरकारची मान्यता नसतानाही त्या शाळा अद्याप सुरू ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. गटशिक्षणाधिकार्‍यांनी शाळा तपासणीच्या दिलेल्या अहवालाच्या आधारे पुणे जिल्ह्यात 13 शाळा अनधिकृतपणे कार्यरत आहेत. त्या शाळांना राज्य सरकारची अद्याप परवानगी नाही.

तरीही या शाळांनी वर्ग सुरू केले असून, त्या शाळांमध्ये विद्यार्थी शिकत आहेत. त्या शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार गटशिक्षणाधिकार्‍यांकडून याबाबत कारवाई सुरू केली जाईल, तर प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे लोणीकाळभोर, दौंड, हवेली तालुक्यांतील चार शाळांनी दंडाची रक्कम जिल्हा परिषदेकडे भरली आहे.

या गावातील आहेत शाळा
अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांमध्ये हवेली तालुक्यातील किरकटवाडी, लोणीकाळभोर, आंबेगाव बुद्रुक तसेच मुळशी तालुक्यातील उरवडे, बावधन, हिंजवडी, जांभे-सागवडे, दत्तवाडी या ठिकाणच्या शाळांचा समावेश आहे. त्याशिवाय दौंड तालुक्यातील दौंड, कासुर्डी, लिंगाळी रोड आणि पुरंदर तालुक्यातील वीर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

अनधिकृतपणे सुरू असलेल्या तेरा शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश गटशिक्षणाधिकार्‍यांना प्रशासनाने दिला आहे. सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना अनधिकृत शाळांची तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे.

                       संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news