पुणे : काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा पेटला; शिंदे पक्ष कमकुवत करत असल्याचा आरोप | पुढारी

पुणे : काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा पेटला; शिंदे पक्ष कमकुवत करत असल्याचा आरोप

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राजकीय व कोरोना काळातील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवरून सुरू झालेल्या शहर काँग्रेसमधील वाद थांबण्याचे नाव घेत नाही. हा वाद दिवसेंदिवस पेटतच असून, पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना संघटनेतील कामकाजाची माहिती नसल्याचा आरोप महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष नुरुद्दीन अली सोमजी यांनी केला आहे. तसेच, शिंदे यांची कृती बालिशपणाची असून, यामुळे पक्ष कमकुवत होत असल्याचा आरोपही केला आहे.

शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्या विरोधातील गट सक्रीय झाला असून, गेल्या काही महिन्यांत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी समोर येत आहे. राजकीय आंदोलनात दाखल झालेले राजकीय आणि कोरोना काळातील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, संजय बालगुडे, वीरेन्द्र किराड, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे, रमेश अय्यर आदींच्या शिष्टमंडळाने नुकतेच पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना निवेदन दिले.

त्यानंतर शिंदे यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन राजकीय गुन्हे सरसकट मागे घेण्याची काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही. कोरोना काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यास पक्षाचा पाठिंबा आहे. राजकीय गुन्हे मागे घेण्यासंदर्भात उपायुक्तामार्फत समिती गठीत करावी, अशी मागणी केली. त्यानंतर आता महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि एनएसयुआयचे माजी शहराध्यक्ष नुरुद्दीन अली सोमजी यांनी प्रसिद्धिपत्राद्वारे शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

विषयाची माहिती नसताना केवळ कुरघोडी करण्यासाठी शिंदे यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे. अशा प्रकारे आयुक्तांची दिशाभूल करणे हे त्यांच्या अध्यक्षपदाला शोभत नाही. संघटनेच्या कामकाजाची माहिती नसल्यामुळे बेजबाबदार वक्तव्य करून ते पक्षाला बदनाम करीत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्ष कमकुवत होत असून, त्यांची ही कृती पक्षाला धोकादायक आहे. या माध्यमातून पक्षामध्ये फूट पाडण्याचे काम सुरू असल्याची टीकाही सोमजी यांनी केली आहे.

Back to top button