पिंपरी : लोणावळ्यात कारने घेतला अचानक पेट | पुढारी

पिंपरी : लोणावळ्यात कारने घेतला अचानक पेट

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एका कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. मात्र, कारचा चालक व प्रवासी यांनी प्रसंगावधान राखल्याने जीवित हानी टळली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सविस्तर वृत्त असे की, लोणावळ्यातून जाणार्‍या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एलआयसी बिल्डिंगसमोर बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक एका व्हॅगनर कारने पेट घेतला..

इंजिनजवळ काहीतरी बिघाड झाल्याने गाडीच्या बोनेटमधून जाळ बाहेर येऊ लागला. हे दिसताच गाडीमधील चालक व अन्य एकजण गाडीतून बाहेर आले. दरम्यान, आग वाढत गेल्याने कारचा दर्शनी भाग आगीच्या भक्ष्यस्थानी गेला होता. या वेळी शेजारीच असलेल्या पेट्रोलपंपावरून आग प्रतिरोधक सिलिंडरच्या सहाय्याने येथील कर्मचारी अनिकेत उंबरे, स्थानिक युवक अमित लोखंडे व महेश कल्याणकर यांनी पुढाकार घेऊन आग विझवली. आगीमध्ये कारचा दर्शनी भाग जळून खाक  झाला आहे.

Back to top button