चिखली फाटा येथे रस्त्यासाठी आंदोलन; शेतकरी, व्यावसायिक, शेतमजूर, महिला, शालेय विद्यार्थी सहभागी | पुढारी

चिखली फाटा येथे रस्त्यासाठी आंदोलन; शेतकरी, व्यावसायिक, शेतमजूर, महिला, शालेय विद्यार्थी सहभागी

जंक्शन (ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : लासुर्णे जवळील लहिरोबानगर, कर्दनवाडी, बंबाडवाडी, मानकरवाडी या रस्त्यांच्या मागणीसाठी इंदापूर-बारामती महामार्गावरील चिखली फाटा येथे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी, व्यावसायिक, शेतमजूर, महिला, शालेय विद्यार्थ्यांनी या रास्ता रोको आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. येथील लहिरोबानगर, कर्दनवाडी, नलवडेवस्ती, बंबाडवाडी, मोहितेवाडी, मानकरवाडी या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सुमारे 6 किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या 20 वर्षांपूर्वी झाले होते. तेव्हापासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही.

याबाबत दै मपुढारीफमध्ये सोमवारी (दि. 9) सविस्तर वृत्त देण्यात आले होते. ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. बुधवारी (दि. 11) सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत चिखली फाटा येथे परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात वारकरी संप्रदायाच्या वतीने भजन करून सांप्रदायिक पसायदान झाले. त्यानंतर शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते प्रशासनाच्या वतीने पंचायत समितीचे कृषी विभागाचे शेख यांनी प्रतिनिधी म्हणून निवेदन स्वीकारले. या वेळी बारामती इंदापूर राज्य महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.

या रास्ता रोको आंदोलनास ग्रामपंचायत बेलवाडी, ग्रामपंचायत मानकरवाडी, इंदापूर तालुका बाळासाहेबांची शिवसेना यांनी पाठिंबा दिला आहे. येत्या 20 दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सर्व आंदोलनाच्या वतीने संजय कदम, शेतकरी बांधव व ग्रामस्थांच्या वतीने अशोक इंगवले, लैला खिलारे, तसेच शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या अडचणींबाबत मनोगत व्यक्त केले.

हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेत घेतला आहे, पण मंजुरी मिळालेली नसून ती लवकरच मिळेल. त्यानंतर लगेचच निविदा होईल व काम सुरू होईल.

                                                          – एस. एस. कुलकर्णी,
                                 कार्यकारी अभियंता, पंतप्रधान ग्रामसडक योजना

Back to top button