...तर ते उमेदवार निवडणूक लढविण्यास ठरणार अपात्र | पुढारी

...तर ते उमेदवार निवडणूक लढविण्यास ठरणार अपात्र

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोणतीही निवडणूक लढवली, तरी दिलेल्या मर्यादेत खर्च करून त्याचा हिशेब ठरवून दिलेल्या वेळेत सादर करणे आवश्यक आहे. वेळेत खर्च सादर न केल्यास पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जाते. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांसाठी 20 जानेवारी ही खर्च सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे वेळेत खर्च सादर करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यामध्ये 18 डिसेंबर 2022 रोजी 221 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये सदस्य पदासह थेट सरपंचपदाच्या 2 हजार 74 जागांसाठी 3 हजार 532 उमेदवारांनी निवडणूक लढविली. तसेच, 761 उमेदवार बिनविरोध निवडून आले.

निवडणूक लढविणार्‍या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण 4 हजार 293 उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब 20 जानेवारीपर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशेब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणार्‍या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब तातडीने सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे.

Back to top button