पुणे : कांदा, लसूण प्रक्रिया उद्योगासाठी मदत | पुढारी

पुणे : कांदा, लसूण प्रक्रिया उद्योगासाठी मदत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपनी, नव उद्योजक आणि विद्यार्थ्यांसाठी आणि महिला बचत गटासाठी अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून खेड येथील कांदा व लसूण संशोधन केंद्रामार्फत विशेष मदत करण्यात येत आहे. यामुळेच जुन्नर, खेड, आंबेगावसह राज्य व देशभरातील शेतक-यांना नाममात्र शुल्क घेऊन प्रशिक्षण, यंत्रसामग्री, कार्यालयापासून ते मार्केटिंगपर्यंत संशोधन केंद्राच्या वतीने मदत करण्यात येणार आहे.

याबाबत कांदा, लसूण संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजीव बळीराम काळे यांनी सांगितले की, शासनाने सन 2019 मध्ये ही योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत संबंधित शेतकरी, गट अथवा शेतकरी कंपनीकडून नाममात्र 5 हजार रुपये भरून घेऊन अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर अंतर्गत सर्व मदत केली जाते. यामध्ये केवळ कांदा, लसूण उत्पादन करून न थांबता प्रक्रिया उद्योग उभारून संबंधित

उत्पादनाची मूल्यवाढ करणे, बियाणे निर्मिती करणे अशा विविध कारणांसाठी मदत करण्यात येणार आहे. पाच हजार रुपये भरून अर्ज केल्यानंतर हा अर्ज संबंधित समितीमार्फत मंजूर करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित शेतकरी, गट, कंपनी यांना प्रशिक्षण, कार्यालय उभारणी, यंत्रसामग्री, प्रयोगशाळा, आवश्यक मार्केटिंग, शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळवून देणे, विविध ठिकाणी आयोजित होणा-या प्रदर्शनात स्टॉल उपलब्ध करून देणे आदी सर्व प्रकारची मदत कांदा व लसूण संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात येणार आहे. यामुळेच जास्तीत जास्त शेतक-यांनी, महिला बचत गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. राजीव काळे यांनी केले.

चढ-उताराचा फटका टाळण्यासाठी उपक्रम
बाजारातील किंमतीच्या चढ-उताराचा फार मोठा फटका शेतक-यांना बसतो. याच पार्श्वभूमीवर शेतक-यांनी केवळ कांदा व लसूण उत्पादन न करता याच्या प्रक्रिया उद्योगात उतरावे, यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम आहे.

कांदा, लसूण प्रक्रिया उद्योगाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. पुणे, नाशिकसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा, लसूण उत्पादन होत असतानादेखील अपेक्षित तेवढे प्रक्रिया उद्योग तयार झाले नाहीत. याच पार्श्वभूमीवर कांदा, लसूण प्रक्रिया उद्योग उभारणीला प्रोत्साहन देण्यासाठी अ‍ॅग्री बिझनेस एक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून मदत करण्यात येते. जास्तीत जास्त शेतकरी, महिला बचत गट यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

                                                           डॉ. राजीव काळे,
                                            वरिष्ठ शास्त्रज्ञ, कांदा व लसूण संशोधन केंद्र.

Back to top button