

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : येरवडा येथील गोल्फ क्लब चौकात महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि.14) होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नव्याने बांधण्यात आलेल्या या पुलास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे.
धर्मवीर संभाजीमहाराज उड्डाणपुलाचे अंतर 650 मीटर असून, 10 पिलरवर पूल उभारण्यात आला आहे. विमानतळाकडून येताना जीएसटी कार्यालयापासून पूल सुरू होत असून, तो गांधीनगर येथील प्रवेशद्वारापर्यंत संपतो. पुलाची रुंदी 15.6 मीटर असून, चार लेन असणार आहेत. पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होते. पुलास आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे. पुलाखाली लॉन लावण्यात आले आहे. जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुलाचे काम वेगाने करण्यात आले आहे.