पुणे : शहरातील अनावश्यक पोल काढण्याचे काम सरू | पुढारी

पुणे : शहरातील अनावश्यक पोल काढण्याचे काम सरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध रस्त्यांवर व पदपथांवर अनेक ठिकाणी बीन कामाचे पोल (खांब) उभे असल्याचे जी 20 परीषदेसाठी सुरू असलेल्या कामाच्या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे हे अनावश्यक पोल काढण्याचे काम महापालिकेच्या विद्युत विभागाने हाती घेतले आहे. पुण्यात पुढील आठवड्यात जी 20 परीषद होत आहे. या निमित्ताने महापालिकेकडून रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजकांची रंगरंगोटी, चौकांचे सुशोभिकरण, स्वच्छता आदी कामे सुरु आहे.

याशिवाय सार्वजनिक प्रकाश व्यवस्थाही सुधारण्यात येत आहे. विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावरील मेरीएट हॉटेल या दरम्यानच्या पथदिव्यांचे पोल आणि फिटींगचे काम अंतिम टप्प्यात आहे. जेथे रस्ता दुभाजक आहेत, अशा ठिकाणीचे पदपथावरील विद्युत पोल मध्यभागी उभे केले जात आहेत. हे काम करीत असतानाच विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांना अनावश्यक पोल आढळून आले. नव्याने पोल बसविले गेल्यानंतर जुने पोल तेथेच वर्षानुवर्षे उभे आहेत. या पोलचा काहीच उपयोग नाही त्यामुळे ते काढण्याचे काम विद्युत विभागाने हाती घेतले आहे.

शहरातील विविध चौकांत वाहतुक नियंत्रण दिवे बसविले गेले आहे. या चौकांतील वाहतुक नियंत्रण दिवे आणि त्यांची यंत्रणा बदलल्यानंतर ते नवीन पोलवर बसविले जातात. अशा प्रकारे जुने बिनकामाचे सत्तरहून अधिक पोल विद्युत विभागाने काढल्याचे  विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले.

Back to top button