पुणे : अडीच लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

पुणे : अडीच लाखांचा ऐवज लंपास

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गुरूद्वारा कॉलनी, लोहगाव येथील एका बंद सदनिकेतून चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने असा 2 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी मनीषकुमार प्रसाद (वय 38) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 26 डिसेंबर ते 1 जानेवारी 2023 या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे राहते घर बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तिजोरीतील 40 हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा 2 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. पोलिस उपनिरीक्षक साळवी तपास करत आहेत.

दानपेटी फोडण्याचा प्रयत्न
गणेशखिंड रोडशेजारी असलेल्या सूर्यमुखी दत्तमंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. या प्रकरणी, शिवाजीनगर पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत निरंजन ढोक यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.

एटीएम कार्डची चोरी
गावी जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना एका महिलेजवळील बॅगेतून चोरट्यांनी पाच हजारांची रोकड, कागदपत्रे व एटीएमकार्ड असा ऐवज लंपास केला. त्यानंतर एटीएम कार्डचा वापर करून 33 हजार व दुसर्‍यांदा 40 हजार अशी एकूण 78 हजार रुपयांची रोकड चोरली. ही घटना 6 जानेवारीला घडली. याप्रकरणी येवलेवाडी येथील एका 59 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विनाकारण तलवारीने मारहाण
घरासमोर मुलाबरोबर शतपावली करणार्‍या तरुणाला मारहाण करत असताना मध्यस्थी करणार्‍या भावाला उलट्या तलवारीने मारहाण केली. दहशत पसरविणार्‍या चार जणांच्या टोळक्यावर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. प्रशांत विजय मुदगल (32) आणि स्वप्नील मुदगल (29) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत विनायक ऊर्फ मुदगल आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मनीषा ज्ञानेश्वर धोत्रे (37, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

Back to top button