देशातील पालिका आयुक्तांची उद्या पुण्यात परिषद; ‘भविष्यातील शहरे’वर विचारमंथन | पुढारी

देशातील पालिका आयुक्तांची उद्या पुण्यात परिषद; ‘भविष्यातील शहरे’वर विचारमंथन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर उद्या (दि.13) पुण्यात देशातील सुमारे 50 महापालिकांच्या आयुक्तांची परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये भविष्यातील शहरे या विषयाला अनुसरून नैसर्गिक आपत्ती, पर्यावरण आणि महापालिकांचे आर्थिक धोरण, विविध योजना यांवर माहितीचे आदानप्रदान, समूह चर्चा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

पुण्यात 16 आणि 17 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची जी-20 परिषद होणार आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार उद्या (शुक्रवार) देशभरातील 50 महापालिकांच्या आयुक्तांची परिषद आयोजित केली आहे. या परिषदेसाठी सूरत, चेन्नई, अहमदाबाद, भोपालसह राज्यातील व अन्य राज्यांतील महापालिका आयुक्तांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या परिषदेत मशहरांपुढील भविष्यातील आव्हानेफ या विषयावर माहितीचे आदानप्रदान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. प्रामुख्याने शहरांना नैसर्गिक आपत्तीशी करावा लागणारा सामना, पर्यावरण पूरक शहरांसाठीच्या उपाययोजना, महापालिका आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी उचलावी लागणारी पावले आदींबाबत राबविण्यात येणार्‍या योजना, प्रकल्पांची माहिती आदींची देवाण-घेवाण केली जाणार आहे,असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

Back to top button