पुणे : कोयता गँगच्या मुसक्या आवळणार; पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांची माहिती | पुढारी

पुणे : कोयता गँगच्या मुसक्या आवळणार; पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोयता गँगसाठी स्पेशल स्क्वॉडची (विशेष पथक) स्थापना करण्यात आली आहे. याद्वारे पुणेकरांमध्ये कोयत्याची दहशत माजविणार्‍यांचा बंदोबस्त केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली. पुण्यातील राज्य राखीव दल गट क्रमांक दोन (एसआरपीएफ) येथे होत असलेल्या 33 व्या महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धा 2023 चे उद्घाटन पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले.

या वेळी राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक अनुपकुमार सिंह, कारागृह व सुधारसेवा अप्पर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, एसआरपीएफचे अप्पर पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, होमगार्डचे महासमादेश भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलिस महासंचालक संजय कुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पुण्याचे सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सेठ म्हणाले, राज्यात 3 वर्षांनी ही स्पर्धा होत आहे. कोरोनामुळे तीन वर्षे स्पर्धा झाली नाही. यामध्ये राज्यातील पोलिस गटातून खेळाडू सहभागी होतात. या स्पर्धेत जिंकलेल्या खेळाडूंना नॅशनल स्पर्धेसाठी पाठवले जाते. शेवटच्या वेळी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या पोलिस स्पर्धेत महाराष्ट्राला तिसरा क्रमांक मिळाला होता. त्यात तीस पदके महाराष्ट्र पोलिसांना मिळाली होती. यातून पोलिस फिट राहतील तसेच खेळाडूही तयार होतील, असा या स्पर्धेचा उद्देश आहे.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत विचारले असता सेठ यांनी सांगितले की, महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. सन 2022 पोलिस दलासाठी चांगले गेले. राज्यात कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. तर, नक्षलविरोधी कारवाईतही गडचिरोली तसेच गोंदिया भागांतील कामगिरी उत्तम आहे.

पुण्यातील कोयता गँगबाबत विचारल्यानंतर सेठ यांनी सांगितले की, कोयता गँगची दखल पोलिस आयुक्तांनी घेतली आहे. त्यांनी स्पेशल स्क्वॉडची नेमणूक केली आहे. या गुन्ह्यांना पायबंद कसा घातला जाईल, याबाबत उपाययोजना सुरू आहे. लवकरच पुण्यातील कोयता गँगला पायबंद घातला जाईल.

मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती
या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11 जानेवारी) होणार होते. मात्र, मुंबईतील कार्यक्रमांमुळे मुख्यमंत्री उद्घाटन समारंभास आले नाहीत.

Back to top button