पुणे : केळकर संग्रहालय मेटाव्हर्स तंत्रज्ञानाद्वारे पाहता येणार | पुढारी

पुणे : केळकर संग्रहालय मेटाव्हर्स तंत्रज्ञानाद्वारे पाहता येणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राजा दिनकर केळकर संग्रहालयाचा मेटाव्हर्स तंत्रज्ञानाद्वारे (आभासी जगतातील) अनुभव मोबाईल फोन, वेब ब्राऊजर, हेड माउंटेड डिव्हाईस आदी उपकरणांच्या माध्यमातून घेणे शक्य होणार आहे. भारताचा पहिला मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म
भारतव्हर्स व भारतातील कला व हस्तकलेच्या संग्रहाद्वारे देशाच्या बहुआयामी सांस्कृतिक वारसाचे जतन करणारे राजा दिनकर केळकर संग्रहालय यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. मेटाव्हर्स अनुभव देणारे देशातील पहिले संग्रहालय म्हणून संग्रहालयाची नोंद होणार आहे.

आभासी जगतातील अनुभव निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या फिचर एन्हान्समेंट व क्रिएशनसाठी वस्तुसंग्रहालय आणि भारतव्हर्स यांच्यात परस्परपूरक सहयोग प्रस्थापित करण्यासाठी हा करार झाला आहे. यानुसार संग्रहालयाद्वारे डिजिटल कंटेन्ट पुरविण्यात येणार आहे, तर भारतव्हर्सतर्फे मेटाव्हर्स अनुभवासाठी आवश्यक डिझाईन, डेव्हलपमेंट आणि फिचर एन्हान्समेंट करण्यात येणार आहे. भारतव्हर्सच्या प्लॅटफॉर्मवर हा मेटाव्हर्स अनुभव घेण्याची सुविधा असेल. पहिल्या टप्प्यात नेत्रचिकित्सक डॉ. श्रीकांत केळकर यांच्या साहाय्याने निर्माण केलेली राजा दिनकर केळकर संग्रहालयाची थ्रीडी व्हर्च्युअल टूर ही भारतव्हर्सच्या प्लॅटफॉर्मवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारतव्हर्सच्या माध्यमातून आम्ही संयुक्तरीत्या संग्रहालयाचा (आभासी जगतातील) मेटाव्हर्स अनुभव निर्माण करीत आहोत. आभासी माध्यमातून संग्रहालय पाहण्यासाठी जगभरातील लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच ते कधी पुण्यात आले, तर संग्रहालयाला भेट देण्यासाठी नियोजनही करू शकतात. आभासी स्वरूपात असले, तरी वापरकर्त्याला आपण प्रत्यक्षात त्या वेळेला संग्रहालयातच असल्याचे मेटाव्हर्सच्या इमर्सिव्ह एक्सपिरियन्सद्वारे अनुभवता येणार आहे. या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

                         सुधन्वा रानडे, संचालक, राजा दिनकर केळकर संग्रहालय.

 

Back to top button