

पुणे; पुढारी वृत्तसेवा : येत्या 13, 14 आणि 15 तारखेला जी 20 शिष्टमंडळाचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. त्यांचे पुणे विमानतळावर विमानतळ प्रशासनाकडून जंगी आणि पुणेरी पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली. पुणे विमानतळावर जी 20 शिष्टमंडळाचे प्रतिनिधी विविध कंपन्यांच्या विमानांमधून उतरतील. ते उतरल्यावर पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला या प्रतिनिधींचे औक्षण करून तिलक लावून स्वागत करतील.
त्यावेळी पारंपरिक वस्त्र परिधान केलेले ढोलपथक ढोल, लेझिमच्या जंगी वादनाने प्रतिनिधींचे स्वागत करतील. त्यानंतर या प्रतिनिधींसाठी नव्यानेच उभारण्यात आलेल्या एरॉमॉलमध्ये त्यांच्या नाष्ट्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नाष्टा केल्यानंतर हे शिष्टमंडळाचे प्रतिनिधी वाहनाने पुढील ठिकाणी मार्गस्थ होतील, असे ढोके यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, हे प्रतिनिधी येणार असल्याने विमानतळ आणि परिसरात स्वच्छतेसह विविध ठिकाणी डागडुजी करण्यात आली आहे. तर हे प्रतिनिधी विमानतळ रस्त्याने शहरात दाखल होणार असल्यामुळे या रस्त्यांवर देखील महापालिकेकडून सुशोभीकरण करण्यात आले आहे. रस्त्यांची दुरूस्ती, भिंतींची रंगरंगोटी, सुशोभीकरणासाठी झाडांची लागवड यासह ठिकठिकाणी फुलझाडांच्या मोठ्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.
शहरात 16 व 17 जानेवारी रोजी जी-20 परिषद होत आहे. त्यानिमित्ताने शहराचे रूपडे बदलत आहे. एअरपोर्ट ते सेनापती बापट मार्गावरील भिंतींवर सुंदर चित्रे रेखाटण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यात फुलेवाडा, शनिवारवाडा, पुणे स्टेशनची सुंदर चित्रे लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
लाल महाल ते विद्यापीठ आज जनजागृती फेरी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने लाल महालपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत आज जी-20 शिखर परिषद जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे. विद्यापीठाशी संलग्न साडेसात लाख विद्यार्थी तसेच प्राध्यापक व सामान्य नागरिकांसाठी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून तसेच जी-20 परिषदेची सर्व सामन्यांना माहिती व्हावी या उद्देशाने कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे समन्वयक आशिष सांगळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.