पुणे : तोंडाच्या कर्करोगासाठी नॅनो कर्क्यूमिन उपयुक्त | पुढारी

पुणे : तोंडाच्या कर्करोगासाठी नॅनो कर्क्यूमिन उपयुक्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले बायो-नॅनो शास्त्रज्ञ डॉ. विजय कनुरु यांनी नॅनो कर्क्युमिनच्या वापरातून मुखाच्या कर्करोगावर उपयुक्त नॅनो मेडिसिन विकसित केले आहे. त्यांचे संशोधन इंडियन असोसिएशन ऑफ ओरलच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

डॉ. कनुरु यांच्या संशोधनामुळे प्राथमिक अवस्थेतील तोंडाच्या कर्करोगावर स्टिरॉइड्स न वापरता उपचार करणे शक्य झाले आहे. केमोथेरपी व वेदनादायक रेडिएशन थेरपीवरील रुग्णाचे अवलंबित्व कमी होऊन मुखाच्या कर्करोगाची पुनरावृत्ती प्रतिबंधित करणे या उपचारपद्धतीने साध्य होते.

मुखाचा कर्करोग प्राथमिक पातळीवर असलेल्या 30 रुग्णांच्या समूहावर महिनाभर औषधाच्या ट्रायल्स घेण्यात आल्या. यादरम्यान त्यांना वेदना शमन, तोंडातील लाल चट्टे कमी होण्यास मदत झाल्याचे दिसून आले. व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्ती, मुखाच्या समस्या असलेले रुग्ण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधाचे सेवन करू शकतात, अशी माहिती डॉ. कनुरु यांनी दिली.

देशात तोंडाच्या कर्करोगामुळे प्रत्येक तासाला 5 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू होतो. रुग्णांना कमी त्रासदायक व परवडणार्‍या दरातील उपचारपद्धती विकसित करण्याचा माझा मानस होता. त्याद्वारे नॅनो कक्यूमिनच्या वापरातून ‘ब्रेकॅन’ हे नॅनो मेडिसिन विकसित केले आहे.
                                                      डॉ. विजय कनुरु, शास्त्रज्ञ, बायो नॅनो

Back to top button