पारगाव : कोबी-फ्लॉवर झाला चारा; बाजारभाव नसल्याने शेतकर्‍यांची अडचण | पुढारी

पारगाव : कोबी-फ्लॉवर झाला चारा; बाजारभाव नसल्याने शेतकर्‍यांची अडचण

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : कोबी, फ्लॉवर या तरकारी पिकांच्या बाजारभावात झालेली घसरण कायम आहे. शेतकर्‍यांनी ही पिके सोडून दिली आहेत. आता शेतकरी कोबीचा वापर जनावरांना चारा म्हणून करू लागले आहेत. मागील दोन महिन्यांपासून कोबी, फ्लॉवरच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कवडीमोल बाजारभावामुळे गुंतविलेले भांडवल तर दूर, परंतु तोडणी आणि मजुरी तसेच वाहतुकीचा खर्चदेखील वसूल होत नाही. यामुळे कोबी, फ्लॉवर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकर्‍यांनी कोबी तसेच फ्लॉवरच्या उभ्या पिकांमध्ये जनावरे सोडली आहेत.

काही शेतकर्‍यांनी कोबी तसेच फ्लॉवर दूध देणार्‍या जनावरांना खाऊ घालण्यास सुरुवात केली आहे. धनगर-मेंढपाळांचे मुक्काम सध्या कोबीच्याच शेतात दिसत आहेत. राजस्थानी गोपालकदेखील बैलगाडी, ट्रॅक्टर ट्रॉलीत कोबी तसेच फ्लॉवरचे गड्डे भरून नेऊन जनावरांना खाऊ घालताना दिसत आहेत. बाजारभाव घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला असला, तरी मेंढपाळ गोपालकांची मात्र यामुळे चंगळ झाली आहे.

Back to top button