पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव; बदलत्या वातावरणाचा विपरीत परिणाम | पुढारी

पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव; बदलत्या वातावरणाचा विपरीत परिणाम

निमगाव दावडी; पुढारी वृत्तसेवा : मागील आठवड्यात धुके व ढगाळ हवामान यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण निर्मिण झाले आहे. वातावरणातील बदलांमुळे शेतीतील विविध पिकांवर मावा, तुडतुडे, करपा आदींसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. खेड तालुका व इतर भागांत मोठ्या प्रमाणात ढगाळ हवामान व धुके यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे. यावर्षी खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चार महिने सतत पाऊस पडत होता, त्यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली. त्यानंतर रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा रोपे, बटाटा यांची लागवड केली. रासायनिक खते, कांदालागवड मजुरी, शेतीचा खर्च असा मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. त्यात हमीभावाची खात्री नाही. अनेक शेतकर्‍यांनी ऊस पिकात गहू, हरभरा ही आंतरपिके घेतली आहेत.

परंतु सतत ढगाळ वातावरण आणि गायब झालेली थंडी व पुन्हा थंडी याचा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. यावर्षी चार महिने दमदार पाऊस झाल्याने जलपातळी चांगली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असले, तरी सध्याचे वातावरण पाहता शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसत आहे.

Back to top button