पिंपरी: सांगा शाळेत जायचे कसे? मनपा विद्यार्थ्यांच्या नशिबी पायपीट; दररोज तीन किलोमीटरपेक्षा जास्त पायपीट | पुढारी

पिंपरी: सांगा शाळेत जायचे कसे? मनपा विद्यार्थ्यांच्या नशिबी पायपीट; दररोज तीन किलोमीटरपेक्षा जास्त पायपीट

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शाळेत येणे सोयीस्कर व्हावे, यासाठी शहरातील अंतर्गत भागात बससुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, सध्या ही सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज पाच ते सहा किलोमीटरची पायपीट करत शाळा गाठावी लागत आहे.

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत असले तरी शाळेत येण्यासाठी वाहतुकीचा खर्च परवडत नाही. यासाठी पिंपरी- चिंचवड शिक्षण समितीतर्फे पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत येण्या – जाण्यासाठी विद्यार्थी वाहतूक बससुविधा उपलब्ध करून देणार होते. शिक्षण विभागाने मपीएमएपीएलफकडे तशी मागणी केली आहे. तसेच आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांचे घर आणि शाळेतील अंतर हे तीन किलोमीटरच्या आतच असले पाहिजे. मात्र, बससुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रोजची पायपीट करावी लागत आहे.

आत्तापर्यंत मनपाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये 259 शालाबाह्य मुले तर खासगी सामाजिक संस्थातर्फे 550 पेक्षा अधिक शालाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले आहे. या शालाबाह्य मुलांचे शाळेपर्यंत पोहोचण्यामागे अनेक प्रश्न आहेत. रस्त्याने एकटे जाताना विद्यार्थ्यांच्या संरक्षणाचा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. शाळा स्मार्ट पण बस सुविधेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पालिका शाळांत पालिकेतर्फे अनेक सोयी- सुविधा देण्यात आल्या आहेत. स्मार्ट, डिजिटल शाळा बनविण्यात आल्या आहेत. ई – लर्निंगवर भर देण्यात आला आहे. लायब्ररी, संगणक लॅब, विज्ञान व गणित यांची स्टेम लॅब आदी सुविधा दिल्या आहेत. मात्र, या सुविधांचा लाभ घेण्यासाठी शाळेत येण्यासाठी बससुविधा दिलेली नाही. त्यामुळे अनेक वेळा विद्यार्थी शाळेत नियमित येत नाहीत. याबाबत शिक्षण उपायुक्त संदीप खोत यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

शहरात अशा सात वस्त्या आहेत ज्या ठिकाणांहून विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य बससुविधा उपलब्ध केली होती. मात्र, बंद केल्यापासूून नऊ महिने झाले अद्याप बससुविधा सुरू करण्यात आलेली नाही. आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली आहे. बससुविधा सुरू झाल्याशिवाय लहान मुलांना चालत येणे शक्य नाही व सुरक्षितही नाही.
– प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्षा, सहगामी फाउंडेशन

Back to top button