लोणावळा: जीव मुठीत धरून घ्यावे लागते शिक्षण, सदापूर शाळेची दुरवस्था; देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

लोणावळा: जीव मुठीत धरून घ्यावे लागते शिक्षण, सदापूर शाळेची दुरवस्था; देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कार्ला (लोणावळा), पुढारी वृत्तसेवा: लोणावळ्याजवळील सदापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी सांस्कृतिक भवनाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.

सदापूर प्राथमिक शाळेची इमारत जुनी झाली असून, त्याच्या भिंती जिर्ण झाल्या आहेत. तर, पत्रे फुटले असून, पत्र्यावर प्लास्टिकचा कागद व दगड ठेवण्यात आले आहेत. तसेच, शाळेशेजारी असणार्‍या अंगणवाडी सांस्कृतिक भवन तर पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सामाजिक संस्थांना मदत करण्यास अडचणी

शाळेत भौतिक सुखसुविधा व्यवस्थित नसेल, तर आनंददायी शिक्षण कसे मिळणार, असा प्रश्न पालकांना पडला आहे. आज अनेक सामाजिक संस्था विविध सुविधा पुरवण्यासाठी पुढे येत असतात, पण परवानगी मिळवण्यासाठी कागदपत्रांच्या पूर्तता करण्यात अनेक अडचणी येत असल्यामुळे शाळेची स्थिती सुधारत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

गेल्या एक वर्षापासून काही सामाजिक संस्था या शाळेसाठी मदत करण्यास तयार आहेत. परंतु, कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने आजही त्यांना परवानगी मिळवण्यासाठी फेर्‍या माराव्या लागत आहेत. सदापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी सांस्कृतिक भवनाची दुरवस्था झाली आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविले आहे. प्रशासकीय कार्यवाहीमुळे काही कामे करता येत नसल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.

Back to top button