पिंपरी: आनंद गगनात माझा मावेना …! चोरीचे दागिने परत मिळाल्यानंतर तक्रारदार महिला आनंदी | पुढारी

पिंपरी: आनंद गगनात माझा मावेना ...! चोरीचे दागिने परत मिळाल्यानंतर तक्रारदार महिला आनंदी

पिंपरी : महाराष्ट्र पोलिस रेझिंग डेनिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चोरट्यांकडून परत मिळवलेले दागिने संबंधित महिलांकडे सुपूर्द केले. एकूण 84 वेगवेगळ्या गुन्ह्यांतील 84 फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. चोरीला गेलेला आपला दागिना पुन्हा मिळाल्याने महिलांचा आनंद गगनात मावत नसल्याचे या वेळी दिसून आले. निगडी येथील मुख्यालयात मंगळवारी (दि. 10) हा कार्यक्रम पार पडला.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त मनोज लोहिया, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, विवेक पाटील, सहायक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर उपस्थित होते.

या वेळी बोलताना पोलिस आयुक्त चौबे म्हणाले की, गुन्ह्यातील चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करताना पोलिस अधिकारी व अंमलदार यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तपास करावा लागतो. आरोपीस अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करणे मोठे आव्हान असते. तपासासाठी परराज्यामध्ये असताना पोलिसांना कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. मात्र, तरीदेखील पोलिस प्रयत्नांची पराकाष्ठा करून आरोपी व त्याच्या साथीदारांकडून मुद्देमाल हस्तगत करून आणतात. हा मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

नागरिकांनीदेखील भविष्यात अशा प्रकारच्या चोर्‍या होऊन नयेत, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच, पोलिसांना तपासात सहकार्य करावे. पोलिस सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. दरम्यान, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त विवेक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

1 कोटी 47 लाखांचा मुद्देमाल सुपूर्द

पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण 84 गुन्ह्यांतील 33 लाख 43 हजार 240 रुपये किमतीचे 679 ग्रॅम 590 मिलीग्रॅमचे सोन्याचे दागिने व 739 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच दोन लाख 48 हजार रुपये किमतीचे 15 मोबाईल फोन, 20 हजार रुपयांचा एक लॅपटॉप, 51 लाख 50 हजारांची चारचाकी व दुचाकी अशी एकूण 21 वाहने, सहा लाख 70 हजारांच्या सहा रिक्षा, 37 लाख 57 हजार 765 रुपयांचे टायर व ट्यूब व दोन लाख 21 हजार 100 रुपयांचा इतर मुद्देमाल, असा एकूण एक कोटी, 46 लाख 93 हजार 705 रुपये किंमतीचा मुद्देमाल संबंधित मूळ मालकांना पोलिस आयुक्त चौबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Back to top button