पुणे : फडतरे बंधूंच्या डाळिंबाला उच्चांकी 411 रुपये भाव ! | पुढारी

पुणे : फडतरे बंधूंच्या डाळिंबाला उच्चांकी 411 रुपये भाव !

राजेंद्र कवडे देशमुख : 

बावडा : अंगात कष्ट करण्याची धमक व नियोजन असेल, तर युवा शेतकरी काय करू शकतो याचे उदाहरण म्हणजे कचरवाडी येथील विठ्ठल फडतरे व रामदास फडतरे हे बंधू आहेत. चालू वर्षी त्यांनी 9 एकर क्षेत्रातून सुमारे 50 ते 52 टन दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन काढले. तसेच उच्चांकी प्रतिकिलोस रुपये 411 दरही मिळवला. विठ्ठल सिद्धू फडतरे व रामदास सिद्धू फडतरे हे अल्पभूधारक बंधू! प्रारंभी नियोजन करून त्यांनी 2 एकर क्षेत्रावर डाळिंबाचे भगवा जातीचे पीक घेतले. काबाडकष्ट करून दर्जेदार डाळिंब उत्पादन घेतल्याने त्यांना आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब बाजारात त्यावेळी उच्चांकी दर मिळाला. त्यानंतर गेली सहा वर्षे त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अहोरात्र मेहनतीच्या जोरावर या फडतरे बंधूंनी 6 वर्षांत डाळिंबाचे क्षेत्र 2 एकरवरून 28 एकरापर्यंत वाढविले आहे. आटपाडी बाजारात ते सध्या एक नंबरचे डाळिंब उत्पादन शेतकरी झाले आहेत.

चालू वर्षी त्यांच्या डाळिंबाला सरासरी 140 ते 145 रुपये दर मिळाला आहे. उच्चांकी 441 किलोपर्यंत भाव मिळाला. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या डाळिंब बागेची काढणी पूर्ण झाली आहे. आता पुढील वर्षी 16 एकर क्षेत्रावरील डाळिंब काढणीस तयार होईल, असे विठ्ठल फडतरे यांनी सांगितले.राज्यातील तसेच इंदापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून तेल्या व मर रोगामुळे हैराण होऊन डाळिंबाच्या बागाच्या बागा काढून टाकत असताना फडतरे बंधूंचे डाळिंबाचे निर्यातक्षम दर्जेदार उत्पादन हे सध्या इतर शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पाण्याचे नियोजन, वेळेवर औषध फवारणी

आटपाडी बाजारातून त्यांच्या निर्यातक्षम डाळिंबाची दुबई, युरोप देशात व्यापारी निर्यात करीत आहेत. डाळिंब उत्पादन शेतकर्‍यांनी पाण्याचे योग्य नियोजन व वेळेवर औषध फवारणी केल्यास डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेता येते, ज्यादा पाणी झाल्यास झाडे मर रोगाला बळी पडतात, असे विठ्ठल फडतरे यांनी नमूद केले.

Back to top button