बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी परिसरात सध्या विविध विकासकामे सुरू असून, बांधकाम साहित्य, माती व राडारोडा इत्यादींची वाहतूक करणार्या अवजड वाहनांची रस्त्यांवर वर्दळ आहे, यामुळे नागरिकांसह शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी शाळा प्रशासन व पालकांकडून होत आहे.
बिबवेवाडी येथील पोकळे वस्तीजवळ स्मशानभूमीच्या परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. याच भागात विद्यानिकेतन इंग्रजी माध्यम व पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा आहे. या शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत परिसरातील रस्त्यांवरून बांधकाम साहित्य व राडारोडा करणार्या ट्रक, डंपर आदी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या भागात तीव्र असल्याने अपघाताचा धोका आहे. यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न पालक व नागरिकांनी केला आहे. पालक धनंजय त्रिमल म्हणाले, 'स्मशानभूमीच्या परिसरातील अवजड वाहतुकीबाबत महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागालाही पत्र दिले आहे. पालकांना मुलांना शाळेत सोडताना व आणताना मोठी कसरत करावी लागत आहे.'
शाळेच्या आजूबाजूने मोठमोठी अवजड वाहने उभी केली जात आहेत. तसेच शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी अवजड वाहतूक बंद करण्याबाबत संबंधित बांधकाम विकसकांना पत्र दिले आहे. तरीदेखील अवजड वाहनांची वाहतूक सुरूच
असल्याने शाळा प्रशासनावर ताण येत आहे.
-सुनिता यादव, मुख्याध्यापिका, विद्यानिकेतन इंग्रजी माध्यम विद्यालय, बिबवेवाडीबिबवेवाडीतील स्मशानभूमी परिसरात विविध शाळा आहेत. या भागात सुरू असलेल्या अवजड वाहतुकीची तातडीने दखल घेऊन वाहतूक पोलिस कर्मचार्यांची नेमणूक केली जाईल.
-विनायक साळुंखे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, बिबवेवाडी.