पुणे : गृहिणींकडून चिक्की गुळाला वाढली मागणी | पुढारी

पुणे : गृहिणींकडून चिक्की गुळाला वाढली मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मकरसंक्रांतीचा सण अवघ्या पाच दिवसांवर आल्याने गुळवडी, पोळी, तिळपापडी, तिळवडी करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी लागणार्‍या चिक्की गुळाला मागणी वाढली असून, गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ बाजारासह शहरातील दुकांनामध्ये चिक्की गुळाची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मार्केट यार्डातील गूळ बाजारात कराड, कोल्हापूर, सांगली येथून दहा व तीस किलोचे 300 ते 400 डाग, तर 500 ते 700 बॉक्स, तर दौंड तालुक्यातील केडगाव येथूनही चिक्कीचे 50 डाग दररोज दाखल होत आहे. तीस व दहा किलोच्या डागासह एक, अर्धा व पाव किलो अशा बॉक्स स्वरूपात आणि रसायनांचा वापर न केलेला गूळ उपलब्ध झाला आहे. मार्केट यार्डातील घाऊक गूळ बाजारात दहा किलोला 3 हजार 800 ते 4 हजार 200 व एक किलोची 42 ते 47 रुपये रुपये दर मिळत आहे. कराड, पाटण, केडगाव येथून येणारी चिक्की ही चिकट व घट्ट असल्याने संक्रांतीच्या उत्पादनासाठी मोठी पसंती मिळत आहे, अशी माहिती गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.

गुळाचे व्यापारी शशांक हापसे म्हणाले, की संक्रांतीसाठी उत्पादने तयार करताना मऊ व चिकटपणा असलेल्या ’चिक्की’ गुळाची विक्री जास्त होते. दर वर्षी विशेषतः मकरसंक्रांतीच्या सणासाठी लाडू, तसेच चिक्की उत्पादकांकडून 15 डिसेंबरपासून गुळाच्या खरेदीस सुरुवात होते. तर, साधारणत: 1 जानेवारीपासून घरगुती ग्राहकांकडून गुळाला मागणी वाढते. बाजारात गूळवडी, गुळाची पोळी, पापडी, तिळवडी त्याचबरोबर तेलबिया प्रकारातील शेंगदाणा, तीळ, तसेच काजू, सुकामेवा या प्रकारासाठी चिक्की गुळाला मागणी होत आहे.

Back to top button