पुणे : राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलनाचे उद्या उद्घाटन | पुढारी

पुणे : राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलनाचे उद्या उद्घाटन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा सर्व विद्यापीठांमध्ये  उत्साहाचे वातावरण आहे.
15 वे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन यंदा 12 ते 15 जानेवारीदरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार असून, उद्घाटन राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे.  शैक्षणिक वर्ष 2006-07 पासून ही आंतरविद्यापिठीय संशोधन संमेलनाचे (आविष्कार स्पर्धा) आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत राज्यातील अनेक विद्यापीठांतील विद्यार्थी सहा विद्याशाखांमध्ये प्रकल्प सादर करतात. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी घेण्यात येणार्‍या या स्पर्धेच्या आयोजनाचा मान यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे.

याचे उद्घाटन 12 जानेवारीला विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे संचालक प्रा. डॉ. मोहन वाणी, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले आणि आविष्कार समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

12 ते 14 या दोन दिवसांत प्रकल्पांचे सादरीकरण, पोस्टर प्रेझेंटेशन, संगणकीय सादरीकरण विद्यार्थी करतील. अंतिम निकाल दिनांक 15 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती डॉ. संजय ढोले यांनी दिली. समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटीएमचे संचालक प्रा. डॉ. आर. कृष्णन उपस्थित
राहणार आहेत.

स्पर्धेविषयी थोडक्यात…

दोन वर्षांच्या खंडानंतर स्पर्धा होणार
राज्यातील 22 विद्यापीठांचा सहभाग
दोन हजारांपासून बक्षिसे ते एक वर्षासाठी एक लाख वीस हजारापर्यंतची शिष्यवृत्ती
मुलांपेक्षा मुलींचा सहभाग अधिक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एकूण 48 प्रकल्प स्पर्धेत
2006 पासून आतापर्यंत 14 स्पर्धा झाल्या असून, त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 9 वेळा विजेते, तर 4 वेळा उपविजेता
649 संशोधन प्रकल्प होणार सादर
मानव्यविद्या आणि भाषा, विज्ञान, औषध व औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आदी सहा विद्याशाखांमध्ये एकूण 649 विद्यार्थी प्रत्येकी एक याप्रमाणे 649 संशोधन प्रकल्प सादर करतील.

Back to top button