पुणे : ‘कोम्बिंग’ मध्ये तीन हजार सराईतांची झडती | पुढारी

पुणे : 'कोम्बिंग' मध्ये तीन हजार सराईतांची झडती

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ‘जी 20’ परिषद तसेच शहरात दहशत माजविण्याच्या घटनांमुळे पोलिसांनी शहरातील 3 हजार 765 गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबवून गुन्हेगारांची चौकशी केली. चौकशीत 698 गुन्हेगार राहत्या पत्त्यावर वास्तव्यास असल्याचे आढळले. सराइतांकडून पिस्तुलासह, काडतुसे व 145 कोयते जप्त करण्यात आले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर आणि पोलिसांची पथके या कारवाईत सहभागी झाली होती.

पोलिसांनी शहरातील हॉटेल, लॉज, एसटी स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात तपासणी मोहीम राबविली. सिंहगड रस्ता पोलिसांनी धायरी भागातील निलेश शिवाजी गायकवाड (वय 35) याला पकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी 43 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 145 कोयते, तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. अमली पदार्थविरोधी पथकाने कोंढव्यातील बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकून हुक्का पार्लरचा मालक शाहरुख हारु शेख (वय 25) याला अटक केली. या कारवाईत पोलिसांकडून हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू आदी जप्त करण्यात आले. बेकायदा नायलॉन मांजा विक्री प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी 88 जणांना अटक केली.

कोयते विक्रेत्यांवर कारवाई

शहर, उपनगरांपासून ते मध्यवस्तीत कोयत्याचा वापर करून दहशत माजविणार्‍या गुंडांनी धुडघूस घातला होता. त्यामुळे गुन्हे शाखेने बेकायदा कोयते विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बोहरी आळीतील एका दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दुकानातून विक्रीसाठी ठेवलेले 45 हजारांचे 105 कोयते जप्त केले. पोलिस कर्मचारी अजय थोरात व निलेश साबळे यांना खबर्‍यामार्फत माहिती मिळाली होती की, बुधवार पेठ बोहरी आळीतील एका दुकानात हार्डवेअरच्या सामानाच्या नावाखाली अनधिकृतपणे कोयता विक्री सुरू आहे. त्यानुसार पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात कोयते जप्त केले. या प्रकरणी, हुसेन खोजेमा राजगरा (वय 32, रा. उंड्री) याच्याविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनील, अजय जाधव, रमेश तापकीर, कर्मचारी अजय जाधव, अमोल पवार, राहुल मखरे, विठ्ठल साळुंखे, महेश बामगुडे, शशिकांत दरेकर यांच्या पथकाने कारवाई केली.

Back to top button