पुणे : पीमपी करणार खासगी वाहनांना चार्ज ; पुण्यात सात ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन | पुढारी

पुणे : पीमपी करणार खासगी वाहनांना चार्ज ; पुण्यात सात ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पीएमपी प्रशासन आता ताफ्यातील ई-बससोबतच उत्पन्न वाढीसाठी शहरात धावणार्‍या खासगी ई-वाहनांसाठी चार्जिंगची सेवा सुरू करीत आहे. त्याकरिता पीएमपी प्रशासन पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सात ठिकाणी नवी चार्जिंग स्टेशन उभारणार असून, त्याचे काम आठवडाभरात सुरू होणार आहे.

सध्या पीएमपीची आर्थिकस्थिती खूपच हलाखीची आहे. उत्पन्नाच्या दुप्पट ते तिप्पट खर्च पीएमपीला करावा लागत आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी पीएमपीला नवीन स्रोत शोधावे लागणार आहेत. त्याचाच भाग म्हणून पीएमपी प्रशासन आता खासगी दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचेसुध्दा चार्जिंग करणार आहे. त्यासंदर्भातील कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) पीएमपीएने एका कंपनीला दिला आहे.
अदानी टोटल गॅस प्रा.लि. या कंपनीकडून येत्या आठवडाभरात चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांची स्व:मालकीची वाहनेदेखील पीएमपी चार्जिंग करणार आहे.

पीएमपीला मिळणार इतका वाटा…

पीएमपी प्रशासनाकडून अदानी कंपनीला ही चार्जिंग सेवा पुरविण्यासाठी पीएमपी काही जागा देणार आहे. त्याठिकाणी ही कंपनी सर्व स्ट्रक्चर उभारून पुणेकरांना चार्जिंग सेवा पुरविणार आहे. कंपनी पीएमपी प्रशासनाला 32.50 टक्के पीएमपीला महसुलात वाटा देणार आहे, तर पीएमपी 900 ते 1200 स्क्वेअर फूट जागा कंपनीला देणार आहे.

 

पीएमपीकडून खासगी वाहनांचे आता चार्जिंग केले जाणार आहे. त्याकरिता सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून, त्याची वर्क ऑर्डर दिली आहे. येत्या आठवडाभरात चार्जिंग स्टेशन उभारण्याची कार्यवाही करण्यात येईल.
    – ओमप्रकाश बकोरिया,  अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

 

 

Back to top button