पुणे : जी 20 परिषदेत पुण्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवा ; मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची सूचना | पुढारी

पुणे : जी 20 परिषदेत पुण्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवा ; मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची सूचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जी 20 बैठकीच्या निमित्ताने पुणे येथे येणार्‍या प्रतिनिधींचे स्वागत करताना पुण्याच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवावे. पुणेरी ढोल पथकाच्या साथीने प्रतिनिधींचे स्वागत करा, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.
जी 20 बैठकीच्या पूर्वतयारी बाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त वर्षा लड्डा आदी उपस्थित होते.

श्रीवास्तव म्हणाले, अतिथींसमोर चित्रफितीच्या माध्यमातून पुण्याचे आणि राज्याचे वैभव मांडावे. बैठकांच्या ठिकाणी जिल्ह्यातील विकास आणि संस्कृतीविषयक बाबी मांडण्यात याव्यात. पुण्याच्या तयारीविषयी माहिती देताना विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, या बैठकांच्या पूर्वतयारीत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी सायकल रॅली, स्वच्छता मोहीम, शाळा-महाविद्यालयांतून चर्चासत्र व बैठकांचे प्रात्यक्षिक, बाईक रॅली, वॉकथॉन आदी उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. प्रतिनिधींचे विमानतळावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येईल. पालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, शहरातील चौकांमध्ये 75 आकर्षक शिल्पे उभारली आहेत. रस्त्याकडेला सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. वातावरण निर्मतिीसाठी पालिकेने विविध उपक्रम आयोजित केले आहेत. या तयारीत नागरिकांचेही उत्स्फूर्त सहकार्य आहे.

Back to top button