पुणे : 96 व्या अ. भा. मराठी साहित्य संमलेनात वैविध्यपूर्ण कार्यक्रम

पुणे : 96 व्या अ. भा. मराठी साहित्य संमलेनात वैविध्यपूर्ण कार्यक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विविध विषयांवरील परिसंवाद… दोन कविसंमेलने…कवी कट्ट्यात 500 कवींच्या कवितांचे सादरीकरण… दिग्गजांच्या प्रकट मुलाखती अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी वर्धा येथे होणारे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, कार्यक्रमपत्रिकाही तीन ते चार दिवसांत तयार होणार आहे.  संमेलनात 17 ते 18 सत्रे आयोजित करण्यात आली आहेत आणि महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या तत्त्वज्ञानाचा आजच्या दृष्टीने विचार, संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचे कार्य… अशा विविध विषयांवर परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियावर केले जाणार असून, घरबसल्या साहित्यप्रेमींना उद्घाटन सत्र पाहता येणार आहे. वर्धा येथे 3 ते 5 फेब—ुवारी दरम्यान साहित्य संमेलन होणार असून, आयोजक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाकडून त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. साहित्य संमेलनातील कार्यक्रमांविषयीची चर्चाही साहित्यवर्तुळात सुरू झाली असून, कोणकोणते परिसंवाद होतील, संमेलनात यंदा कोणत्या विषयांवर चर्चा रंगेल, याबाबत साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. संमेलनाच्या कार्यक्रमांविषयीची माहिती विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी दै. 'पुढारी'ला दिली.

ते म्हणाले, 'संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. जगभरातील साहित्यप्रेमींना घरबसल्या हा सोहळा पाहायला मिळणार आहे. संमेलनाच्या ठिकाणी 2 हजार लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. 1 लाख साहित्यप्रेमी संमेलनाला भेट देतील, अशी आशा आहे. संमेलनाची कार्यक्रमपत्रिका तयार होण्यास तीन ते चार दिवस लागणार आहेत. कार्यक्रमाविषयीची तयारी झालेली असून, ऐनवेळेस काही बदल होऊ शकतात, त्यामुळे सगळे बदल करूनच कार्यक्रमपत्रिका जाहीर केली जाणार आहे.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news