पुणे: ऊस काढण्यासाठी सात वर्षांचा चिमुकला ट्रॅक्टरच्या मागे पळाला, त्याने ट्रॉलीमधील ऊसही मोडला पण… | पुढारी

पुणे: ऊस काढण्यासाठी सात वर्षांचा चिमुकला ट्रॅक्टरच्या मागे पळाला, त्याने ट्रॉलीमधील ऊसही मोडला पण...

वालचंदनगर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: अंथूर्णे (ता. इंदापूर) येथे रस्त्याने निघालेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरमधून ऊस काढण्यास गेलेल्या एका सात वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १०) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जुन्या शेळगाव रस्त्यावर अंथूर्णे येथील सत्संग भवनसमोर घडली.

या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शेळगावकडून अंथूर्णेच्या दिशेने ऊसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच १६ एएम ६५०६) निघाला होता. ट्रॅक्टर अंथूर्णे गावाच्या मध्यवस्तीतून जात असतानाच सायबु तात्या जाधव (वय ७, रा. अंथूर्णे) हा ट्रॅक्टरमधून ऊस काढण्यासाठी ट्रॅक्टरच्या मागे पळत होता. त्याने ट्रॉलीमधील ऊस मोडलाही होता; मात्र ऊस मोडताच त्याचा तोल गेला आणि तो ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीखाली पडला. दुर्दैवाने ट्रॉलीचे चाक सायबू याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सायबू याच्या आईचे त्याच्या लहानपणीच निधन झाले असून वडील उपजिविकेसाठी भटकंती करून प्रपंच चालवतात. सायबू त्याच्या आजीकडे असतो. सायबू याला एक भाऊ आहे; मात्र त्यालाही बोलता येत नसल्याने आणि सायबू याच्या अपघाती जाण्याने जाधव कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Back to top button