

तळेगाव दाभाडे, पुढारी वृत्तसेवा: यावर्षी नगर परिषदेला सर्व करांच्या माध्यमातून 43 कोटी 24 लाख 3 हजार 905 रुपये वसुली करावयाची होती. मात्र, आतापर्यंत फक्त 29 टक्के वसुली झालेली आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत 71 टक्के कर वसुली करण्याचे आवाहन तळेगाव नगर परिषद प्रशासनासमोर आहे.
नगर परिषदेची मालमत्ता कराची वसुली गेल्या 9 महिन्यांत अतिशय अल्प झालेली आहे. त्यामुळे शंभर टक्के वसुलीकरिता नगर परिषद प्रशासनाने कठोर उपाययोजना करून वसुलीची कडक मोहीम हाती घेतली आहे. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, करनिरीक्षक विजय शहाणे, तुकाराम मोरमारे हे प्रयत्नशील आहेत.
मालमत्ता कर वसुलीसाठी नगर परिषद प्रशासनाने दोन वसुली पथके तयार केली आहेत. 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची थकबाकीदारांना नोटीस दिली आहे. जर जप्तीची नोटीस देऊनदेखील मालमत्ताधारकांनी थकीत कर भरला नाही. तर भविष्यात लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील थकीत मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर आपला थकीत कर जमा करण्याचे आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले.
नगर परिषदेचे करनिरीक्षक विजय शहाणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात प्रवीण शिंदे, आशिष दर्शले, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, उषा बेल्हेकर, विशाल लोणारी आणि अरविंद पुंडलिक आहेत. तर, तुकाराम मोरमारे यांच्या पथकात प्रवीण माने, आदेश गरुड, श्रीमती वैशाली आडकर व प्रशांत गायकवाड आदी आहेत. यापुढे थकीत मालमत्ताकर दहा हजार रुपयांच्या पुढे असेल तर त्या करदात्यावरदेखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.