भिगवणचे ट्रामा सेंटर ठरले केवळ सांगाडा; चार वर्षांपासून इमारत धूळ खात पडून | पुढारी

भिगवणचे ट्रामा सेंटर ठरले केवळ सांगाडा; चार वर्षांपासून इमारत धूळ खात पडून

भिगवण; पुढारी वृत्तसेवा : भिगवणच्या वैभवात जेवढी भर टाकणारी तेवढीच ती रुग्णांच्या सेवेलाही पुरून उरणारी तब्बल 19 कोटी रुपये खर्चून सरकारने भिगवण येथे ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाची टोलेजंग इमारत बांधली. मात्र, ज्या प्रमाणात तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचार्‍यांची भरती करायला हवी ती सरकारने केली नसल्याने गेल्या चार वर्षांहून ही इमारत अक्षरशः धूळ खात अडगळीत पडली आहे. रडतखडत ग्रामीण रुग्णालय चालू केले असले, तरी कर्मचारी व औषधांचा येथे प्रचंड अभाव असल्याने तेही सलाइन व ऑक्सिजनवर आले आहेत.

या ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयासाठी जवळपास 100 पेक्षा अधिक कर्मचार्‍यांची गरज आहे. मात्र, सरकारकडून याची भरतीच होत नसल्याने कसेबसे सुरू केलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा भार केवळ आठ-दहा जणांवर आहे. या इमारतीत ट्रामा सेंटर, ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहत, असे तीन भाग पडतात. पैकी ट्रामा सेंटरची इमारत तात्पुरती पोलिस ठाण्याला वापरासाठी देण्यात आली आहे, तर ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत सुविधांचा प्रचंड अभाव आहे.

येथील एक्स-रे मशिन बंद आहे, भूलतज्ज्ञ नाहीत, दोन रुग्णवाहिका असून त्यांना चालक नाहीत, ’क’ आणि ’ड’ची भरती नसल्याने मामा, मावशी, स्वच्छता कर्मचारी, वॉर्डबॉय नाहीत व जे कर्मचारी उपलब्ध आहेत त्यांचा पगार कधीच वेळेत नाही. अगदी वर्ष वर्ष पगार नाही. सध्या तर येथील औषधांचा साठा संपलेला आहे. शवविच्छेदन केंद्र आहे, मात्र त्यासाठी लागणारे कटर व स्वच्छता कर्मचारी नाहीत. परिणामी, येथे मृतदेहाची सतत हेळसांड होते व शवविच्छेदनासाठी इंदापूरला जावे लागते.

यंत्रसामग्रीदेखील पडून
ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णालयासाठी यंत्रसामग्री उपलब्ध आहे. परंतु, आवश्यक कर्मचारी नसल्याने इमारतीप्रमाणे या यंत्रसामग्रीवर धूळ दाटली आहे. बर्‍याच खोल्या कुलूपबंद असल्याने बहुतांश भाग धुळीने माखून अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. एकंदरीत, पुणे-सोलापुर राष्ट्रीय महमार्गावरील अपघात तसेच भिगवण व परिसरातील रुग्णांची व्याप्ती पाहता मोठा गाजावाजा करून ट्रामा सेंटर व ग्रामीण रुग्णलयाची इमारत उभी करण्यात आली असली, तरी असुविधांमुळे ही इमारत कवडीमोल झाली आहे.

Back to top button