मृतदेहाची अदलाबदल; कर्मचार्‍यास काढले; संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयामधील प्रकरण | पुढारी

मृतदेहाची अदलाबदल; कर्मचार्‍यास काढले; संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयामधील प्रकरण

पिंपरी; पुढारी वृत्त्तसेवा : महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील डेड हाऊसमधून महिलांच्या मृतदेहाची अदलाबदली झाल्याप्रकरणी दोषी कंत्राटी कर्मचार्‍यास कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
तर, पालिका आस्थापनेवरील एका कर्मचार्‍याची विभागीय चौकशी करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदारावरही कारवाई केली जाणार आहे, अस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सोमवारी (दि.10) सांगितले.

पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदलीचा प्रकार 19 ऑक्टोबर 2022 ला घडला होता. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती. त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्त सिंह यांनी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्ती केली होती. त्या समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तब्बल दोन महिन्यांनंंतर तो अहवाल आयुक्तांसमोर सादर करण्यात आला.

प्रशासनाच्या संथगती कारभारामुळे ते प्रकरण दाबल्याची चर्चा सुरू होती. त्याबाबत विचारले असता आयुक्त बोलत होते. आयुक्त सिंह म्हणाले की, चौकशी अहवालानुसार डेड हाऊसमधील कंत्राटी कर्मचार्‍यास तात्काळ काढून टाकण्यात आले आहे. तर, पालिका आस्थापनेवरील कर्मचार्‍याची विभागीय चौकशी करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाणार आहे. दोषी पोलिस कर्मचार्र्‍यांबाबत पोलिस आयुक्तांना कळविण्यात आले आहे. तसेच, स्पर्श रुग्णालयाबाबत सुनावणी व चौकशी पूर्ण झाली असून, आठवडाभरात कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button