पुणे : राजकीय गुन्ह्यांवरून काँग्रेसमध्ये पेटला वाद; बागवे, जोशींनी दिलेले पत्र अधिकृत मानू नये : अरविंद शिंदे | पुढारी

पुणे : राजकीय गुन्ह्यांवरून काँग्रेसमध्ये पेटला वाद; बागवे, जोशींनी दिलेले पत्र अधिकृत मानू नये : अरविंद शिंदे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात अगोदरच विकलांग झालेल्या काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. राजकीय गुन्हे मागे घेण्याबाबत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी यांनी पोलिस आयुक्तांना दिलेले पत्र अधिकृत मानू नये, असे पत्र काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पोलिस आयुक्तांना दिले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या जोरात आहे. ठिकठिकाणी पक्षांतर्गत गटबाजी मिटविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अशा वेळी, पुण्यात मात्र शहरातील दोन गटात पत्रकाद्वारे संघर्ष सुरू झाल्याचे दिसून आले.

कोरोना साथीच्या काळात सामाजिक, राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेण्याची मागणी कॉँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली होती. त्या शिष्टमंडळात कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, संजय बालगुडे, विरेन्द्र किराड, रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे, रमेश अय्यर आदी होते. त्यावेळी राजकीय गुन्हे पुढील तीन महिन्यात मागे घेण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले.

पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी दिलेले पत्र ही पक्षाची अधिकृत भूमिका समजू नये, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. कोरोना साथीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यास त्यांनी पाठिंबा दिला. मात्र, राजकीय कार्यकर्त्यांविरुद्धचे गुन्हे सरसकट मागे घेण्यास त्यांनी विरोध केला. त्या गुन्ह्याचे स्वरूप पाहून पडताळणी केल्यानंतरच ते मागे घ्यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसभवनवर झालेला हल्ला असे गुन्हे माफ करण्यास विरोध असल्याची भूमिका शिंदे यांनी घेतली. काँग्रेस पक्षाच्या लेटरहेडवर शहराध्यक्षांच्या सहीने दिलेले पत्रच पक्षाची अधिकृत भूमिका म्हणून मानण्यात यावी, असे शिंदे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Back to top button