पिंपरी : उद्योगनगरीत स्ट्रीट क्राईम वाढतोय; सर्वसामान्य जनतेचा जीव मेटाकुटीला

पिंपरी : उद्योगनगरीत स्ट्रीट क्राईम वाढतोय; सर्वसामान्य जनतेचा जीव मेटाकुटीला
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी : स्ट्रीट क्राईम झपाट्याने वाढू लागला आहे. सरत्या वर्षात लूटमार, घरफोड्या आणि वाहनचोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गुन्हेगारीचा आलेख वाढत असला तरीही पोलिस यंत्रणा मात्र, व्हीआयपींच्या दिमतीला अडकून पडल्याचे चित्र आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. असे असले तरीही स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी पोलिसांकडे कोणताही मास्टर प्लान नसल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी – चिंचवड शहरासाठी ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. आयुक्तालय स्थापनेनंतर पोलिसांनी रेकॉर्डवरच्या मोठ्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, मिसरूड न फुटलेल्या भाईंनी शहर कायम अशांत ठेवले. सन 2021 मध्ये 85 जणांचे खून झाले आहेत. तर, मागील वर्षी 2022 मध्ये 80 जणांचे खून झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.

याव्यतिरिक्त पादचार्‍यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, मोबाईल हिसकावणे. तसेच, शस्त्राचा धाक दाखवून लुटणे आदी प्रकारातही वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना रस्त्याने चालणे जिकिरीचे झाले आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांना ममास्टर प्लानफ तयार करण्याची गरज आहे. तरच, उद्योग नगरीतील नागरिकांमध्ये सुरक्षित असल्याची भावना जागृत होईल.

समुपदेशाने दिशा मिळणार का ?
पिंपरी- चिंचवड शहरात मोठ्या गुंडांपेक्षा अल्पवयीन मुले धुमाकूळ घालतात. मग्लॅमरफ असलेल्या एखाद्या मोठ्या गुन्हेगाराला आदर्श मानून कोवळी मुले गुन्हेगारी विश्वाकडे वळू लागली आहेत. यामध्ये झोपडपट्टीतील मुलांचे प्रमाण जास्त आहे. या मुलांवर गुन्हे दाखल केल्यास ते आणखीनच बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे दिशा उपक्रमअंतर्गत समुपदेशन करण्यात येत आहे. यासाठी शहर परिसरात 74 कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमांमुळे व्यसनाधीन तसेच भरकटलेल्या मुलांना दिशा मिळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अल्प
वाहनचोरी हे एक पिंपरी- चिंचवड पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे. मागील वर्षात शहरातून तब्बल एक हजार 590 वाहने चोरीला गेली आहेत. यामध्ये एक हजार 440 दुचाकी, 74 तीनचाकी, 76 चारचाकी वाहने चोरीला गेली आहेत. यातील केवळ 365 वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. म्हणजेच केवळ 23 टक्केच वाहने पोलिसांच्या हाती लागली आहेत.

खाकीचा वावर वाढवण्याची गरज
शहरातील चोर्‍या, घरफोड्या आणि लूटमारीचे प्रकार रोखण्यासाठी शहरात खाकीचा वावर असणे आवश्यक आहे. गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी गस्त, नाकाबंदी अशा उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे. सन 2022 मध्ये 461 ठिकाणी लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. तर, 446 घरे चोरट्यांनी फोडली आहेत. विशेष म्हणजे यातील 64 ठिकाणी चोरट्यांनी दिवसा धाडस केले आहे. त्यामुळे गल्ली बोळातून पायी पेट्रोलिंग, सायकल पेट्रोलिंग या संकल्पना पुन्हा अंमलात आणण्यास सुरुवात केली .

चिरीमिरी कारवाईत समाधान :
मागील वर्षात शहरात तब्बल दोन हजार 770 चोरीच्या घटना घडल्या आहेत. यातील केवळ 25 टक्केच चोर्‍या उघड झाल्या आहेत. ज्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरीही गुन्हे शाखेची पथके किरकोळ टपर्‍या किंवा गर्दुल्ल्यावर कारवाई तसेच एक दोन हजारांची दारू किंवा गुटखा पकडून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त आहेत. गुन्हे शाखेने किचकट गुन्ह्यांची उकल करण्यासह अवैध धंद्यातील मोठ्या धेंडांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.

व्हीआयपी बंदोबस्तामुळे गुन्हे शाखा त्रस्त :
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यामुळे व्हीआयपींना (अतिमहत्त्वाच्या व्यक्ती) स्थनिक पोलिसांसह गुन्हे शाखेचादेखील बंदोबस्त दिला जात आहे. यातच अलीकडे शहरातील व्हीआयपी दौरे वाढले आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकांना हातातील काम सोडून बंदोबस्तासाठी पळावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news