मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र गारठला; पारा 5 अंशांवर, पुण्याचे तापमान 8. 6 अंशांवर | पुढारी

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र गारठला; पारा 5 अंशांवर, पुण्याचे तापमान 8. 6 अंशांवर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हिमालयीन भागात वारंवार धडकत असलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतात दाट धुके आणि तीव्र थंडीची लाट आली आहे. या भागाकडून राज्याकडे अत्यंत थंड वारे वाहत असल्यामुळे राज्यात कोकण वगळता उर्वरित भागात कडाका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि जळगाव येथे राज्यात नीचांकी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणीचे तापमान 5.5 अंशांवर नोेंदवले गेले आहे. पुण्याचा पारा 8.6 अंशांपर्यंत खाली आले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत थंंडीचा कडाका आणखी वाढणार असून शीतलहर येण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सोमवारी जळगाव शहराचे तापमान 5 अंश सेल्सिअसवर घसरले असून नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे 9 अंश तर सातार्‍यात 11 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील किमान तापमानाचा पारा उणे 7.2 अंशापर्यंत घसरला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, बुलडाणा, अहमदनगर, अमरावती, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, नांदेड, परभणी, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि बीड भागांत जोरदार थंडी वाढली आहे, तसेच येत्या दोन दिवसांत या भागात शीतलहर येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागातील सर्वच जिल्ह्यांत खूप थंडी वाढली आहे. पुढील दोन दिवसांत या भागातील सर्वच जिल्ह्यांत शीतलहर येण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण वगळता उर्वरित भागातील किमान तापमानाचा पारा उणे 7.3 अंशांपर्यंत खाली घसरला आहे.

Back to top button