पिंपरी : ‘मराठी तरुणांनी व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवावे’ : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

पिंपरी : ‘मराठी तरुणांनी व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवावे’ : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणाला मंजुरी मिळाल्यास आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गटातील नागरिकांना त्याचा फायदा मिळणार आहे. राज्यामध्ये दरवर्षी 10 ते 20 हजार नोकर्‍या निर्माण होतात. आम्ही यंदा 75 हजार नोकर्‍यांचे आव्हान स्वीकारले आहे. मराठी तरुणांनी केवळ नोकर्‍यांवर विसंबून न राहता व्यवसायात उतरण्याचे धाडस वाढवायला हवे. मराठी माणसाच्या मनातील न्यूनगंड आपल्याला घालवावा लागेल, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 8) व्यक्त केले.
जागतिक मराठी अकादमी आणि पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘शोध मराठी मनाचा – 2023’ या विषयावरील 18 व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

तीन दिवस चाललेल्या या संमेलनाचा रविवारी समारोप झाला. त्या प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, गोव्याचे सांस्कृतिकमंत्री गोविंद गावडे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य तथा संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे,  डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती तथा स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, आदी उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यापीठाचे सेक्रेटरी  डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा कवी रामदास फुटाणे, संमेलनाचे कार्यवाह सुनील महाजन, गौरव फुटाणे, रवींद्र डोमाळे, श्रीकांत कदम, प्रशांत पवार, सुदाम भोरे, सचिन ईटकर आदींचा सत्कार करण्यात आला. पाटील म्हणाले की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढविण्यासाठी आयएएस ट्रेनिंग सेंटर व्हायला हवे. मराठी विद्यार्थी नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी अन्य राज्यात मिळत असतील तर तेथे जायला तयार नसतात. व्यवसायात धाडस केल्यामुळे मी गावाकडे काजूचा कारखाना सुरू करू शकलो. मराठी तरुणांनी व्यवसायात पुढे यायला हवे.

मराठीला ऐतिहासिक वारसा

मराठी भाषा ही ऐतिहासिक वारसा सांगणारी, अध्यात्म सांगणारी भाषा आहे. जगातील बोलीभाषांमध्ये आपली भाषा दहाव्या क्रमांकाची आहे. या भाषेला दर्जा मिळवून देण्यासाठी चिंतन गरजेचे आहे, असे मत राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. राज्याच्या वैभवाची ठिकाणे देशभरात असल्याने ती एकत्र मांडण्यासाठी तरुण इतिहासकारांची सूची बनविणे आवश्यक आहे. देशात जिथे मराठीची स्मारके आहेत, तिथे फलक उभारण्यात यावे. विदेशात 3 कोटी 20 लाख भारतीय नोकरी-व्यवसायात असल्याने त्यांचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी करण्यात यावा. दिल्लीत प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी आलेल्या राज्यातील 10 हजार मराठी मुलांसाठी दिल्लीत संकुल उभारण्यात यावे. अशा मागण्या संमेलनाध्यक्ष
डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केल्या.

डॉ. पी. डी. पाटील यांचा विशेष सन्मान

पिंपरीमध्ये 18 व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करुन हे संमेलन यशस्वी केल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी.पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

राज्य सरकारकडून लवकरच पोर्टल
देशभरात मराठी संस्कृती व मराठीच्या ज्या पाऊलखुणा उमटल्या आहेत त्याचे संवर्धन व जतन करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने लवकरच एक पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिकमंत्री मुनगंटीवार यांनी केली.

Back to top button