

पारगाव (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र थापलिंग नागापूर येथील खंडोबादेवाच्या यात्रेत यंदा दोन दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. कोरोना संकटानंतर भरलेली यात्रा व बैलगाडा शर्यतीवरील उठलेली बंदी, यामुळे यंदा यात्रेत मोठी गर्दी झाल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. पौष पौर्णिमेला भरणारी श्री क्षेत्र थापलिंगची यात्रा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. गावोगावच्या ग्रामदैवतांच्या यात्रा हंगामाला थापलिंगच्या यात्रेपासूनच प्रारंभ होतो. कोरोनाच्या संकटामुळे सलग दोन वर्षे यात्रा बंद होती. यंदा
कोरोनाचे संकट नसल्याने मोठी गर्दी होणार, असा अंदाज यात्रेकरूंनी व्यक्त केला होता. तो अंदाज तंतोतंत खरा ठरला. दोन दिवसांत सुमारे अडीच लाख भाविकांनी खंडोबादेवाचे दर्शन घेण्यासाठी गडावर गर्दी केली होती.
दोन दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल थापलिंग यात्रेत झाली. या यात्रेत पै-पाहुण्यांना जिलबी, भजी, शेव-रेवडी आग्रहाने खाऊ घातली जाते. दोन्ही दिवसांत जिलबी-भजीच्या हॉटेलमध्ये मोठी गर्दी दिसून आली. महिला गृहिणी व शेतकर्यांसाठी असणार्या संसारोपयोगी व शेती उपयोगी वस्तू खरेदी करण्याची थापलिंग यात्रेत मोठी पर्वणीच असते.
संसारोपयोगी साहित्य व शेतीस उपयोगी अवजारे, हत्यारे या यात्रेत मोठ्या प्रमाणावर शेतकरी, महिला खरेदी करतात. महिला गृहिणींनी संसारोपयोगी भांडी, लाकडी शिड्या, पाट्या, टोपल्या, मुलांना खेळणी आदी साहित्य खरेदी केले. शेतकर्यांनी फावडे, खोरी, टिकाव, कुदळ, खुरपी, जनावरांसाठी म्होरक्या, चाबूक, दोर आदी साहित्य मोठ्या प्रमाणावर खरेदी केले.