पुणे : मुलांच्या आवडीनुसार साहित्यनिर्मिती व्हावी : ज्येष्ठ लेखिका व गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर | पुढारी

पुणे : मुलांच्या आवडीनुसार साहित्यनिर्मिती व्हावी : ज्येष्ठ लेखिका व गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘मुलांना करमणूक हवी असते; मन लुभावणारी गोष्ट हवी असते. लेखकांनी बालसाहित्य लिहिताना आपण ते कशासाठी लिहित आहोत याचा विचार करावा, मुलांच्या वाचनाची आवड ओळखून बालसाहित्याची निर्मिती करावी,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखिका व गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांनी व्यक्त केली. बालसाहित्य संमेलनात बालचित्रकारांना सामावून घेतल्याने त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.

विवेक साहित्य मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुकुंद भवन ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नुक्कड बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी डॉ. नारळीकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे, महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव, बालसाहित्यकार राजीव तांबे आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. नारळीकर म्हणाल्या, ‘बालसाहित्य लिहिताना साहित्यकाराला मुलाला काहीतरी शिकवावेसे वाटत असते. त्यातून तात्पर्य निघावे असे वाटत असते, परंतु मूल कुठल्या प्रकारचे वाचन करण्यासाठी पुस्तक हातात घेते, त्याला काय हवे आहे हा भाग बालसाहित्यामध्ये आधी यायला पाहिजे.’

डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, ‘मुलांच्या प्रत्यक्ष सहभागातून हे संमेलन होत आहे ही बाबसुद्धा छान आहे. मुलांशी संवाद साधायचे म्हटले की, मला कविताच दिसायला लागते,’ असे सांगून त्यांनी ‘झाड आजोबा’ ही कविता सादर करताना मुलांनाही त्यांच्याबरोबर कविता म्हणायला सांगितले. डॉ. अर्चना कुडतरकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सायली शिगवण हिने केले.

Back to top button