वासुंदे ग्रामस्थ खडीक्रशरच्या धुळीने त्रस्त; वारंवार तक्रार करूनही गावनेते व अधिकारी गप्प | पुढारी

वासुंदे ग्रामस्थ खडीक्रशरच्या धुळीने त्रस्त; वारंवार तक्रार करूनही गावनेते व अधिकारी गप्प

उंडवडी(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : वासुंदे गावात अनेक वर्षांपासून विनापरवाना खडीक्रशर चालू आहेत. मात्र, खडीक्रशरमधून उडणार्‍या धुळीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. काही खडीक्रशरना कागदोपत्री ग्रामपंचायत एनओसी आहे, तर काही विनापरवाना आहेत. ज्या क्रशरला मान्यता आहे त्यांची नोंद ग्रामपंचायत दफ्तरी नाही. यात दोषी कोण? शेतकरी की क्रशरवाले? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

खडीक्रशरमधून उडणार्‍या धुळीने गावकरी त्रस्त झाले आहेत. आजूबाजूच्या परिसरातील शेती तसेच घरातही मोठ्या प्रमाणात धूळ साचत आहे. शेतकर्‍यांनी घेतलेली पिके धुळीमुळे येतच नाहीत. गुरांसाठी मका, ऊस तसेच चारा केला तर तो कोण विकतच घेत नाही. गुरेही असा चारा खात नाहीत. धुळीने दम्यासारखे आजार उद्भवू लागल्याने ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत. दुसरीकडे, शेती असूनही शेतकर्‍यांना शेती पडीक ठेवावी लागत असल्याचे चित्र सध्या वासुंदे गावात पाहायला मिळत आहे.

प्रश्न विचारणार्‍यांवरच दाखल होतो गुन्हा
धुळीबाबत क्रशरमालकांना विचारले तर उलट तेच शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल करीत आहेत. पैशाच्या जोरावर हे प्रकरण चालत असल्याने शेतकरी हतबल होत आहेत. याबाबत निवेदन तहसीलदारांना दिले असून, याबाबत ते काय निर्णय घेणार? शेतकर्‍यांना न्याय मिळणार का? याची येथील शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

क्रशरवर कार्यवाही करून धूळ बंद करावी; अन्यथा तहसीलदार्‍यांच्या कार्यालयाबाहेर संपूर्ण गावातील शेतकरी आंदोलनाला बसणार आहेत.
                                                                       संदीप जांबले, अध्यक्ष,
                                                                  माहिती सेवा समिती, वासुंदे

Back to top button