मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी सर्वसामान्यांचीही : डॉ. सदानंद मोरे यांचे मत | पुढारी

मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी सर्वसामान्यांचीही : डॉ. सदानंद मोरे यांचे मत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘दैनंदिन व्यवहार मराठी भाषेत होत राहिले, तर मराठी भाषा टिकेल. मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी सर्वसामान्यांचीही आहे. प्रत्येक संमेलनामधून मराठीच्या व्यावहारिकतेचा विचार झाला पाहिजे,’ अशी अपेक्षा राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली. विवेक साहित्य मंच, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नुक्कड साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले.

त्या वेळी ते बोलत होते. साहित्य संमेलनाध्यक्ष भारत सासणे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितीन कुलकर्णी, विवेक समूहाचे समन्वयक महेश पोहनेरकर व्यासपीठावर होते. सासणे म्हणाले, ‘लेखकाला सामाजिक आणि राजकीय असा काही फरक करायचाच नसतो. त्याला समाजजीवन अभिप्रेत असते.

हे अभिप्रेत असलेले समाजजीवन तो प्रामाणिकपणे मांडतो आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न असतो.’ ‘तरुणाईने लेखनाकडे जरूर वळावे, पण फक्त लेखनाने पोट भरणार नाही, हे लक्षात घेऊन साहित्य क्षेत्रातील इतर नवमाध्यमांचाही विचार करावा, लेखनाकडे आवड म्हणून पाहावे,’ असे मत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त युवालेखक प्रणव सखदेव यांनी व्यक्त केले. नुक्कड साहित्य संमेलनाच्या शनिवारच्या समारोप सत्रात सखदेव यांच्याशी डॉ. अर्चना कुडतरकर आणि अभय नवाथे यांनी संवाद साधला.

Back to top button