पुणे : शालेय सहलींमुळे एसटीला सुगीचे दिवस; महिन्यात धावल्या 996 गाड्या | पुढारी

पुणे : शालेय सहलींमुळे एसटीला सुगीचे दिवस; महिन्यात धावल्या 996 गाड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या प्रासंगिक करार सेवेला सध्या जोरदार प्रतिसाद मिळत असून, एकाच महिन्यात एसटीच्या 996 गाड्या धावल्या आहेत. त्या गाड्यांद्वारे 43 हजार 824 प्रवाशांनी प्रवास केला. यातून एसटीच्या पुणे विभागाला 1 कोटी 57 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. शालेय सहली, लग्न, पर्यटन, दौरे यांसारख्या प्रासंगिक करारांसाठी एसटीकडून गाड्या उपलब्ध करून दिल्या जातात.

या गाड्यांद्वारे एसटीला अतिरिक्त उत्पन्न मिळते. डिसेंबर 2022 या एकाच महिन्यात एसटीच्या प्रासंगिक करार सेवेला पुणे विभागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. पुणे विभागातील एसटीच्या 13 डेपोअंतर्गत या गाड्यांचे बुकिंग करण्यात आले असून, यात सर्वाधिक गाड्या शालेय सहलींसाठी बुक करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच, या 996 गाड्यांनी 5 लाख 20 हजार 782 किलोमीटरचा टप्पा यावेळी पार केला आहे.

या भागात सहलींकरिता सर्वाधिक गाड्या धावल्या
पुणे विभागातून प्रासंगिक करार सेवेसाठी डिसेंबर महिन्यात 996 गाड्या धावल्या. यातील सर्वाधिक गाड्या सहलींकरिता एसटी महामंडळाने दिल्या असून, या गाड्या सहलींसाठी महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, मुरुड, जंजिरा, गणपतीपुळे, सिंधुदुर्ग, वाई, पाचगणी याभागांकरिता धावल्या.

अष्टविनायक दर्शनच्या 12 गाड्या फुल्ल
एसटीच्या पुणे विभागाकडून नागरिकांना स्वस्तात अष्टविनायक दर्शन बससेवा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला या सेवेसाठी एसटीने 2 बस सोडल्या होत्या. त्या सेवेला आता चांगला प्रतिसाद मिळाला असून, एकूण 12 बस फुल्ल झाल्या आहेत. तर आणखी 13 वी बस प्रशासनाने या सेवेसाठी दिली आहे. तिचेही बुकींग सुरू झाले आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी देण्यात आलेल्या प्रासंगिक करार सेवेला मागील महिन्यात चांगला प्रतिसाद मिळाला. यात सर्वाधिक गाड्या शालेय सहलींसाठी आम्ही दिल्या होत्या. तसेच, अष्टविनायक दर्शन बससेवेला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

             ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

एसटीचे प्रति किमी दर…
साधी बस : 55 रुपये
साधी बस (विद्यार्थ्यांसाठी): 27 रुपये
शिवनेरी : 100 रुपये
शिवशाही स्लीपर सीटर : 72 रुपये
शिवशाही साधी : 70 रुपये

Back to top button