पुणे : जम्बो, टायगर, मोर, रॉकेट पतंगांना मिळतेय पसंती | पुढारी

पुणे : जम्बो, टायगर, मोर, रॉकेट पतंगांना मिळतेय पसंती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मोठ्या आकारातील जम्बो पतंग, रॉकेट पतंग, रंगीबेरंगी मल्टिकलर पतंग असो वा स्टार प्रकारातील नवीन स्टार पतंग… अशा नव्या प्रकारातील पतंग सध्या लक्ष वेधून घेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवनवीन पतंग दुकानांमध्ये आले असून स्टार पतंग, रॉकेट पतंग, टायगर पतंग अन् मोर पतंगांसह जम्बो पतंगाला सर्वाधिक मागणी आहे, तर लहान मुलांसाठीचे छोटा भीम, मोटू-पतलू, पोकेमॉन अन् स्पायडर मॅन पतंगांचीही धूम आहे. सध्या मकर संक्रांतीचा सण काही दिवसांवर असल्याने पतंग खरेदीला उधाण आले आहे. बच्चेकंपनीपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण रविवार पेठेत पतंग खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.

मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा आनंद लुटण्याची रीतच आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पतंगांची खरेदी केली जाते. लहान मुलांसह तरुणांकडून पतंगांची जास्त खरेदी होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पतंगांचे नानाविध प्रकार दुकानांमध्ये आले आहेत. कागदी अन् प्लास्टिकच्या पतंगांमधील रंगीबेरंगी प्रकार लक्ष वेधून घेत आहेत. यंदा नानाविध प्रकारचे पतंग पाहायला मिळत असून, त्यात जम्बो पतंगाला सर्वाधिक मागणी आहे, तर सजावटीसाठीच्या लहान पतंगांचीही खरेदी महिला-तरुणींकडून होत आहे. कागदाची किंमत वाढल्यामुळे पतंगांची किंमत दहा टक्क्यांनी वाढली आहे. पतंगांची किंमत 30 ते 200 रुपयांपर्यंत असून, लहान मुलांच्या प्लास्टिकच्या पतंगांचीही खरेदी होत आहे.

याविषयी पतंग विक्रेते शब्बीर बागवान म्हणाले, ‘यंदा पतंग खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. मागील आठवड्यापासून पतंग खरेदी सुरू झाली असून, कागदी पतंगांची मोठी मागणी आहे. मुंबई, नगर, दिल्ली, बरेली आदी ठिकाणांहून पतंग आम्ही मागवीत असून, त्याची विक्री करीत आहोत. जम्बो प्रकारातील पतंगांची खरेदी सर्वाधिक होत असून, 30 ते 100 रुपयांपर्यंतचे पतंग आमच्याकडे आहेत. कागदाच्या किमती वाढल्याने पतंगांची किंमतही दहा टक्क्यांनी वाढली आहे. विक्रेते सिराज तांबोळी म्हणाले की, कागदी पतंगांना मागणी असून, मल्टिकलर आणि विविध डिझाइनच्या पतंगांची चलती आहे. साधा मांजा आणि कॉटन प्रकारातील मांजा आम्ही विकतो. त्याची किंमत 25 रुपयांपासून पुढे आहे.

नायलॉन मांजा दुकानात नाही; आकाशात कसा?
अप्पर इंदिरानगर येथून जाणार्‍या एका छायाचित्रकाराच्या गळ्याला पतंगाचा दोर अडकला; तो चाचपून पाहिला असता नायलॉन मांजा असल्याचे आढळून आले. थोडसे दुर्लक्ष केले असते, तर अडकलेला मांजा जिवावर बेतला असता. याबाबतचा अनुभव ‘पुढारी’ प्रतिनिधीकडे त्या छायाचित्रकाराने व्यक्त केल्यानंतर ‘पुढारी’कडून परिसरात काही दुकानांत पाहणी करण्यात अली. मात्र, आपल्याकडे नायलॉन मांजा मिळत नसल्याचे सर्वांनी सांगितले. त्यामुळे रस्त्यावर अपघातास कारण ठरणारा नायलॉन मांजा येतो कुठून? हा प्रश्न गुलदस्तातच रहात असल्याची परिस्थिती आहे.

Back to top button