खोर : भरधाव कारने चिरडल्याने दोघांचा मृत्यू | पुढारी

खोर : भरधाव कारने चिरडल्याने दोघांचा मृत्यू

खोर(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : खुटबाव हद्दीत कारने दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास यवत-खुटबाव मार्गावर साळोबावस्ती येथे झाली. या संदर्भात यवत पोलिस ठाण्यात आकाश ज्ञानदेव खंकाळ (रा. खुटबाव, साळोबावस्ती, ता. दौंड) यांनी फिर्याद दाखल केली.

याबाबतची माहिती अशी की, यवत-खुटबाव मार्गावर साळोबावस्ती येथे शुक्रवारी सायंकाळी खुटबावकडून यवतकडे कारचालक आकाश अनिल जगताप (रा. खुटवड वस्ती, यवत, ता. दौंड) हा आपली कार (एमएच 12 यू यू 2999) घेऊन येत होता. यावेळी ओढ्याच्या पुलावर त्याने बाळू सखाराम शिंदे याला जोरदार धडक दिली. त्यानंतर कारचालक आकाश जगताप तसाच भरधाव वेगाने पुढे निघून जात असताना वस्तीतील रहिवासी ज्ञानदेव लाला खंकाळ (वय 64) व ज्ञानदेव गुलाब शेळके (वय 40, दोन्ही रा, खुटबाव, साळोबावस्ती) या दोघांना त्याने पाठीमागून जोरदार धडक देत वाहनाच्या खाली फरफटत लांबवर नेले.

या दोघांच्याही हात-पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. या वेळी वाहनचालक हा जखमींना न पाहता तसेच वेगाने पुढे पळून गेला. त्या वेळी साळोबावस्तीतील रहिवासी सुनिल दत्तू फासगे, कृष्णा बाळू जाधव, लक्ष्मण भगवान चव्हाण या तरुणांनी चारचाकी गाडी व चालकास पाहिले. त्यांनी जखमी ज्ञानदेव लाला खंकाळ व ज्ञानदेव गुलाब शेळके यांना यवत ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ज्ञानदेव लाला खंकाळ व त्यांचे ओळखीचे ज्ञानदेव गुलाब शेळके तसेच प्रियंका खंकाळ हे सर्व जण साळोबावस्ती येथील नारायण चव्हाण यांच्या नातवाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी चालले होते, त्या वेळी ही दुर्घटना घडली. दरम्यान अपघातातील बाळू सखाराम शिंदे यालाही गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहनचालक आकाश अनिल जगताप हा यवत-खुटवडवस्ती येथे जवळच राहत असल्याने ओळखीचा असल्याची घटनास्थळी जमलेल्या नागरिकांमध्ये चर्चा आहे. यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे हे तपास करीत आहेत.

Back to top button