आगामी लोकसभा शिरूरमधून लढविणार : माजी खासदार आढळराव पाटील यांची घोषणा | पुढारी

आगामी लोकसभा शिरूरमधून लढविणार : माजी खासदार आढळराव पाटील यांची घोषणा

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : सन 2024 ची लोकसभा निवडणूक शिरूर मतदारसंघातून लढविणार असल्याची घोषणा शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. लांडेवाडी येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आढळराव पाटील म्हणाले की, पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर समाजव्यवस्था दुरुस्तीसाठी करावा, सद्य:स्थितीत समाजामध्ये विविध जाती-धर्मांवरून आणि राजकीय नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमकी सुरू आहेत.

त्यावर परखड लिखाण करून समाजजागृती करावी. माझ्या राजकीय जीवनात पत्रकारांनी मला फार मोठे स्थान दिले आहे. पत्रकार आणि माझे नाते हे वेगळेच आहे. त्यामुळे पत्रकारांबाबत नेहमी आदर करतो. तोच आदर इतरांनी देखील पत्रकारांना दिला पाहिजे. मी आता 2024 ची लोकसभा निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमांनी मला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी माजी आमदार शरद सोनवणे, भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, भाजपचे तालुकाप्रमुख डॉ. ताराचंद कराळे, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, संचालक योगेश बाणखेले, अशोक गव्हाणे, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, उद्योजक अशोकराव बाजारे, युवा नेते स्वप्निल बेंडे पाटील, मंचरचे माजी उपसरपंच धनेश मोरडे, युवा सेनेचे राष्ट्रीय विस्तारक सचिन बांगर, प्रवीण थोरात पाटील, संतोष डोके, शिवाजी राजगुरू यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Back to top button