पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : नागापूर येथील थापलिंग यात्रेच्या दुसर्या दिवशी गडावर भाविकांनी मोठी गर्दी केली. शनिवारी (दि. 7) दुपारी दोनच्या सुमारास थापलिंग पायथा ते नागापूर गावठाणापर्यंत वाहनांची रांग लागली होती. त्यामुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. कोरोनाच्या संकटानंतर यंदा थापलिंग यात्रा भरली. या वेळी गर्दीचा उच्चांक झाला. दुपारी बारानंतर थापलिंग गडावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली.
मंदिराचा परिसर, बैलगाडा शर्यतीचा घाट, पाळणे, हॉटेलमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुपारी दोनच्या सुमारास थापलिंग पायथ्याजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. अनेक भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावली. त्यामुळे वाहतूक खोळंबली. पायथ्याजवळ घाटाकडे जाणारा रस्ता व गडाकडे जाणारे रस्ते वाहनांच्या गर्दीने फुल्ल झाले होते. नागापूर गावठाणापर्यंत भाविकांना वाहनातून उतरून पायी प्रवास करावा लागला. ऊस वाहतूक करणार्या टायरगाड्या, ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडा वाहतूक करणारी वाहने, भाविकांनी आणलेल्या गाड्या सुमारे दोन तास वाहतुकीच्या कोंडीत अडकल्या.