आळेफाटा: मोबाईलशॉपीमधून चोरी झालेल्या मोबाईलची परदेशात विक्री, पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

आळेफाटा: मोबाईलशॉपीमधून चोरी झालेल्या मोबाईलची परदेशात विक्री, पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
Published on
Updated on

आळेफाटा (पुणे), पुढारी वृत्तसेवा: आळेफाटा (जुन्नर) येथील मोबाईल शॉपी फोडून तब्बल १४० नवीन मोबाईल चोरी करून त्यांची कोलकत्तामार्गे दक्षिण आफ्रिका, नेपाळ व बांगलादेशमध्ये विक्री झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आळेफाटा पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीतील तीन आरोपींना अटक केली असून दोघे जण फरार आहे. आरोपी राजस्थान व गुजरात राज्यातील असून त्यांच्याकडून १४ लाख ५० हजार रुपये व पिकअप जीप असा १९ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली.

ईश्वरलाल हिंमतलाल इरागर (वय ३२, रा. विरार, जि. पालघर, मूळ रा. सिरोही राजस्थान), महावीर जोरसिंग कुमावत (वय ३५, रा. विरार, जि. पालघर, मूळ पाली, राजस्थान) व आवेश अब्दुल सत्तार कपाडिया (वय ३२, रा. चौकबाजार सिंधीवाड, सुरत), अशी अटक केलेल्या आरोपींची पीं नावे आहेत.

आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ५) पहाटेच्या सुमारास चेतन गुगळे यांचे आळेफाटा चौकापासून जवळच असलेल्या मोबाइल शॉपीचे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून विविध कंपन्यांचे १४० पेक्षा अधिक मोबाइल व सीसीटीव्ही कॅमेरा अशा १३ लाख १३ हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्या होत्या. याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी तपास सुरू केला. आळेफाटा चौकातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत गुन्ह्यात वापरलेली जीप (एमएच ४८ एनजी २३८०) ही या परिसरात आढळून आली. सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार विरारमधून ईश्वरलाल इरागर व महावीर कुमावत यांना तसेच गुन्ह्यात वापरलेली जीप ताब्यात घेतली. अधिक तपास केला असता त्यांनी शाहीद अब्दुल सत्तार कपाडिया व संजय यादव ऊर्फ म्हात्रे यांच्यासह आळेफाटा येथील मोबाइल शाॅपी फोडल्याची कबुली दिली. यातील फरार आरोपी शाहीद कपाडिया याने हे मोबाइल त्याचा भाऊ आवेश कपाडिया यास विकल्याचे सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलिस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे व अमित माळुंजे यांनी सुरत येथे जाऊन आवेश कपाडिया यास ताब्यात घेतले. त्याने हे मोबाइल विकत घेतल्याचे व हे मोबाइल दक्षिण आफ्रिका, नेपाळ व बांगलादेश येथे एका व्यक्तीमार्फत विकल्याचे सांगितले. त्याच्याकडून १४ लाख ५० हजार रुपये ताब्यात घेत त्याला अटक केली.

ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक नितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, सहायक फौजदार चंद्रशेखर डुंबरे, पोलिस हवलदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, नवीन आरगडे, हनुमंत ढोबळे, प्रशांत तांगडकर, सुनील कोळी यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news